महाराष्ट्राची खेळाडू तेजस्विनी सावंत हिने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन विभागात सुवर्णपदक जिंकले आणि ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. याचप्रमाणे तिने सांघिक विभागातही महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत तेजस्विनीने ६२२.१ गुणांची नोंद केली. केरळच्या एलिझाबेथ कोशीने रौप्यपदक मिळविताना ६२१ गुणांची कमाई केली. सांघिक विभागात तेजस्विनीने दीपाली देशपांडे (६१०.५) व प्रियल केणी (६०४.९) यांच्या साथीने अजिंक्यपद मिळविले. त्यांनी एकूण १८३५.७ गुणांची नोंद केली. मीनाकुमारी, अंजुम मौदगिल व सायनी कुमारी यांचा समावेश असलेल्या हरयाणा संघाने १८३०.४ गुण नोंदवित रौप्यपदक मिळवले. रेल्वे संघाने १८२२.८ गुणांसह कांस्यपदक पटकावले. या संघात तेजस्विनी मुळे, रुचिरा लवांदे व अनुजा जंग यांचा समावेश होता.
 या स्पर्धेत हरप्रितसिंगने २५ मीटर रॅपिड फायरमध्ये २२ गुण नोंदवित अजिंक्यपद मिळवले. सेनादलाच्या नीरज कुमारने २१ गुणांसह रौप्यपदक पटकाविले. त्याचाच सहकारी गुरप्रित सिंग (१९) याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता विजय कुमारला पात्रता फेरीत बाद व्हावे लागले. सांघिक विभागात सेनादलाने १७०६ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. शिवराज ससे, अक्षय अष्टपुत्रे व विक्रांत घैसास यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने रुपेरी कामगिरी केली. नौदलाने कांस्यपदक मिळविले.
कुमारांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये सेनादलाच्या नीरज कुमार व प्रदीप कुमार यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले. शिवम शुक्ला (दिल्ली) याला कांस्यपदक मिळाले. कनिष्ठ महिलांच्या ५० मीटर रायफल प्रोन विभागात केरळच्या एलिझाबेथ कोशी हिला सुवर्णपदक मिळाले. पंजाबच्या चाहत कौर हिने रौप्यपदक घेतले तर अंजुम मौदगिल हिला कांस्यपदक मिळाले.