तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय नेमबाज

सुप्रिया दाबके

करोनामुळे सध्या सर्वानाच घरी थांबावे लागत असल्याने सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. मात्र ही विश्रांती २०२१ मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक आणि २०२२ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उपयुक्त ठरेल, असे मत नेमबाज तेजस्विनी सावंतने व्यक्त केले.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोहा येथील आशियाई स्पर्धेतून भारताचे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारातील स्थान निश्चित करण्यात तेजस्विनीला यश आले. सध्या करोनाच्या टाळेबंदीमुळे तेजस्विनी तिच्या माहेरी म्हणजेच कोल्हापुरात आहे. ऑलिम्पिक लांबणीवर पडल्यामुळे वर्षभराचा काळ आणि आगामी आव्हानांविषयी तेजस्विनीशी केलेली खास बातचीत-

* ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर पडली आहे. त्यातच करोनामुळे सरावदेखील अशक्य आहे, त्याविषयी काय सांगशील?

माझ्या तयारीवर परिणाम झाला आहे, असे मी म्हणणार नाही. घरातदेखील नियमित सकाळी लवकर उठून मी व्यायाम करते. त्यातच मी गेल्या महिन्यात नवी दिल्लीहून थेट येथे आले. विमानाने प्रवास केल्याने नियमाप्रमाणे मी १४ दिवस स्वत:ला घरामध्येच विलगीकरणात ठेवले होते. आता विलगीकरण संपल्याने माझ्या घराजवळील नेमबाजी केंद्रावर जाऊन मी सराव करणार आहे. ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याने थोडी निराशा असली तरी सध्याच्या स्थितीत ते योग्य आहे. फरक इतकाच होणार आहे की, पुढील वर्षी ऑलिम्पिक असल्याने त्यानंतर विश्रांती घेता येणार नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे २०२२ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे. एरवी ऑलिम्पिकनंतर खेळाडू थोडी फार विश्रांती घेतात. ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यांच्यात दोन वर्षांचे अंतर असते. या स्थितीत सध्या मिळत असलेल्या विश्रांतीचा फायदा खेळाडूंनी घ्यावा, जेणेकरून दोन मोठय़ा स्पर्धासाठी तयारी करता येईल.

*  करोनामुळे टाळेबंदी असताना घरच्यांसाठी कसा वेळ देत आहेस? कोणत्या नव्या गोष्टी करत आहेस?

सध्या मी कोल्हापूरला माहेरी आले आहे. लग्न झाल्यापासून गेली चार वर्षे माहेरी मला मोकळा वेळ काढता आलाच नव्हता. या स्थितीत हा वेळ कुटुंबासोबत देता येत आहे. पुण्यात राहणारी माझ्या सासरची मंडळीदेखील सध्या त्यांच्या गावाला आहेत. याआधी म्हटल्याप्रमाणे गेले १४ दिवस मी घरातच विलगीकरणात होते. मात्र आता स्वयंपाकघरात पदार्थ बनवणे यांसारख्या गोष्टींनाही वेळ देणार आहे. जोडीला माझा सराव सुरू आहेच.

*  ऑलिम्पिकमध्ये अंतिम संघात स्थान मिळेल असा विश्वास वाटतो का?

खेळाडू म्हणून नेहमीच चांगली कामगिरी करण्यावर माझा भर असतो. त्यातच कोणत्याही स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकलेला पाहणे, हेच माझे नेहमी ध्येय असते. देशाचे प्रतिनिधित्व करताना तिरंगा उंचावलेला दिसणे हे मोठे अभिमानास्पद आहे. ऑलिम्पिकचा अंतिम संघ मार्चमध्ये नवी दिल्लीतील विश्वचषक नेमबाजी स्पर्धा झाल्यावर निवडण्यात येणार होता. मात्र आता ती उत्सुकतादेखील लांबली आहे. प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचाच माझा नेहमी प्रयत्न असतो. या स्थितीत ऑलिम्पिकच्या अंतिम संघात जर स्थान मिळाले तर पदक मिळवून देशाचा तिरंगा फडकलेला बघायला जास्त आवडेल.

*  विक्रमी १५ नेमबाज प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याविषयी काय सांगशील?

भारताकडून १५ नेमबाज ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची पहिलीच वेळ असणार आहे. त्यातच भारताकडून नेमबाजांच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा संपलेल्या आहेत. भारतीय नेमबाज जगभरात सर्वोत्तम कामगिरी करत असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. याआधी चीनचे खेळाडू म्हटल्यावर सर्व जण घाबरायचे, मात्र आता भारताचे खेळाडू सहभागी झाले आहेत म्हटल्यावर बाकीच्या देशांना धडकी भरते. या स्थितीत भारताचे नेमबाज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकतील असा विश्वास आहे.