भारताच्या तेजस्विनी सागरने जागतिक शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावले. नवव्या आणि अंतिम फेरीत औरंगाबादच्या तेजस्विनीने श्रीलंकेच्या कविन्य मियुनी राजपक्षवर विजय मिळवत ही सुवर्णमय कामगिरी केली. १५ वर्षांखालील मुलांमध्ये आनंद नादरने रौप्यपदक आणि १७ वर्षांखालील मुलींमध्ये सलोनी सापोळेने रौप्यपदक जिंकले.रशियाच्या एरिना बार्बायेव्हाला कझाकिस्तानच्या अ‍ॅलिसा कोजीबायेवाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे तेजस्विनीला आघाडी मिळाली. तिने नऊ फेरींच्या या लढतीत सहा विजय, दोन अनिर्णित आणि एका पराभव पत्करला आणि सात गुणांची कमाई केली. भारताच्याच इशा शर्माकडून तिला पराभव पत्करावा लागला होता. बार्बायेव्हाला रौप्य, तर अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या नूर अबिदाह शांतीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.