१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीत बांगलादेशकडून कडवी झुंज मिळाली. नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करताना बांगलादेशी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. भारतीय फलंदाजांच्या धावगतीवर अंकुश लावत बांगलादेशी गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. इतर सामन्यांमध्ये धावांता रतीब घालणारे यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना हे भारताचे सलामीवीर अंतिम सामन्यात चाचपडताना पहायाला मिळाले.

बांगलादेशी गोलंदाजांनी आपल्या तेजतर्रार माऱ्यासोबत, भारतीय फलंदाजांना भडकवण्याचाही प्रयत्न केला. तंझिम शाकीबच्या गोलंदाजीवर दिव्यांश सक्सेनाने फटका खेळला. यावेळी चेंडू शाकीबच्या हाती आल्याने त्याने दिव्यांशवर दडपण आणण्यासाठी यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला. यावेळी दिव्यांश वेळेत बाजूला झाल्यामुळे तो थोडक्यात बचावला, अथवा तो चेंडू दिव्यांशच्या डोक्याला लागण्याची शक्यता होती.

या प्रकारानंतर पंचांनी दोन्ही खेळाडूंना समज दिली. आजच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंकडून एकमेकांना भडकावण्याचे प्रयत्न झाले. मात्र बांगलादेशने दिव्यांशसाठी रचलेला सापळा यशस्वी ठरला, अवघ्या २ धावा काढत अविशेक दासच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली.