१० मीटर रायफल प्रकारात रौप्यपदक

युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंडिलाने पुन्हा लक्ष वेधून घेताना आयएसएसएफ रायफल आणि पिस्तुल विश्वचषक स्पध्रेतील १० मीटर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली.
जयपूरच्या २२ वर्षीय अपूर्वीने २०६.९ गुणांची कमाई करताना रौप्यपदक पटकावले. तर तिच्यापासून फक्त ०.६ गुणांच्या फरकावर असणाऱ्या इराणच्या अहमदी ईलाहेने (२०७.५ गुण) सुवर्णपदक जिंकले. सर्बिच्या आंद्रीया अर्सोव्हिकने कांस्यपदक मिळवले.
अंतिम फेरीतील पहिल्या स्तरावरील पहिल्या टप्प्यात अपूर्वीने दमदार कामगिरी करताना दोनदा १०.८ गुण मिळवले. दुसऱ्या टप्प्यात तिने एकूण ३०.६ गुण मिळवले. त्यामुळे अपूर्वीने पदकासाठी दावेदारी सिद्ध केली. दुसऱ्या स्तरावरील अखेरच्या टप्प्यातील शेवटचा नेम साधून तिने १०.२ गुण मिळवले. तर विजेत्या अहमदीने १०.४ गुण मिळवले.
एप्रिल महिन्यात चँगवॉन (कोरिया) येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी (रायफल/पिस्तुल) स्पध्रेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई करून अपूर्वीने आधीच रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत स्थान मिळवले आहे. तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदकही पटकावले आहे. वर्षभरातील चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धामधील १० सर्वोत्तम गुण ग्राह्य धरून विश्वचषक अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड होते.