वर्णद्वेषाविरोधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सुरू केलेल्या मोहिमेला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पाठिंबा दर्शवला आहे. सचिनने शनिवारी ‘आयसीसी’च्या ट्वीटवर प्रत्युत्तर करताना दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचे क्रीडाक्षेत्रावरील प्रसिद्ध विधान पोस्ट केले.

अमेरिकेमध्ये सध्या कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यासंबंधीच ‘आयसीसी’ने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील शेवटच्या चेंडूची चित्रफीत टाकताना त्यामध्ये इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरवर अधिक लक्ष केद्रित केले. त्याशिवाय विविधतेशिवाय क्रिकेट अशक्य आहे, अशा आशयाचा मजकूरही जोडला. आर्चर हा वेस्ट इंडिजमध्ये जन्मलेला असूनही त्याने इंग्लंडला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात कशा प्रकारे मोलाची भूमिका बजावली, हे ‘आयसीसी’ला याद्वारे दाखवून द्यावयाचे होते.

‘‘खेळामध्ये संपूर्ण जग बदलण्याची क्षमता आहे. किंबहुना सगळ्यांना एकत्रित आणण्याची ताकद खेळामध्ये आहे. नेल्सन मंडेला यांचे हे विधान सध्याच्या स्थितीला साजेसे आहे,’’ असे सचिन म्हणाला. त्याचप्रमाणे नागरिकांनी वर्णभेद करणे न थाबंवल्यास जगात अनेकांचा या कारणामुळे मृत्यू होईल, असेही सचिनने सांगितले. सचिन आणि ‘आयसीसी’शिवाय त्याशिवाय वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू डॅरेन सॅमीनेसुद्धा कृष्णवर्णीय नागरिकांच्या हत्येला विरोध दर्शवताना जगभरातील क्रीडापटूंना यावर व्यक्त होण्याचे आव्हान केले आहे.