भारताचा माजी क्रिकेटपटू विक्रमादीत्य सचिन तेंडुलकरने ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी केली आहे. ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास क्रिकेटचा अजुन प्रसार होईल असंही सचिन म्हणाला. एक क्रिकेटपटू या नात्याने मला माझा खेळ अजुन मोठ्या स्तरावर पोहचलेला पहायला आवडेल. तो मुंबईमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होता.

“2016 साली रिओ ऑलिम्पिकदरम्यान मी ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षांशी, क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेशाबद्दल बोललो होतो. सुरुवातीला त्यांना मी कसोटी क्रिकेटबद्दल बोलतोय असं वाटत होतं. पण नंतर त्यांना मी क्रिकेटमध्ये वन-डे, टी-20, टी-10 असे प्रकारही प्रचलित असल्याचं सांगितलं. मात्र भविष्यकाळात ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यास, प्रचलित संघाव्यतिरीक्त इतर संघांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळणं गरजेचं आहे. जोपर्यंत क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेत तोपर्यंत खेळाचं स्वरुप बदललेलं असेल, पण क्रिकेट हा खेळ ऑलिम्पिकमध्ये असणं गरजेचं आहे असं मला वाटतं.” सचिनने क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.