भारत आणि क्रिकेट हे नाते अतूट आहे. भारतात क्रिकेट हा एक धर्म मानला जातो आणि या धर्मातील देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनचे नाव कायमच जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये घेतले जाते. त्याची क्रिकेट कारकीर्द हि प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी प्रेरणादायी आहे. पण आता फक्त भारतातच नाही, तर देशाबाहेरील युवा क्रिकेटपटूंना सचिनचे मार्गदर्शन लाभणार आहे. सचिनने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या संबंधीची घोषणा केली आहे.

आपल्याकडे असलेले गुण आणि कौशल्य याचा युवा खेळाडूंना फायदा व्हावा, या विचाराने प्रेरित होऊन सचिनने हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडमधील मिडलसेक्स क्लबबरोबर करार करत सचिनने एक अकादमी उभारली आहे.

या अकादमीमध्ये ९ ते १४ या वयोगटातील मुला-मुलींना सचिन आणि उत्तर काही दिग्गज क्रिकेटपटू मार्गदर्शन करणार आहेत. ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’ असे या अकादमीचे नाव आहे. या अकादमीतील मुलामुलींना कशा पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात यावे, यासाठी सचिनने खास प्रशिक्षण आराखडाही तयार केला आहे.

‘या अकादमीमध्ये सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाईल. कारण फक्त चांगले क्रिकेटपटूच नव्हे, तर चांगला नागरिक घडवणे हे अकादमीचे ध्येय आहे, अशा भावना यावेळी सचिनने व्यक्त केल्या आहेत.