विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर असलेल्या सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात सोमवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आगामी आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी त्याची सलग दुसऱ्यांदा सदिच्छादूत म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
‘‘२०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सचिन तेंडुलकरला सचिच्छादूत म्हणून मान दिला आहे. आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या स्पध्रेसाठी दुसऱ्यांदा भारताच्या या महान फलंदाजाला हा बहुमान देण्यात आला आहे,’’ असे आयसीसीने म्हटले आहे.
जागतिक क्रीडा क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकाच्या या महास्पध्रेच्या प्रचारासाठी आयसीसीच्या अनेक उपक्रमांत सहभागी होणे, हे सदिच्छादूत सचिनचे कार्य असेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत आगामी विश्वचषक स्पर्धा होणार आहे.
२०११मध्ये सचिनने सहाव्यांदा विश्वचषक स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आणि त्याचे जग्ज्जेतेपदाचे स्वप्न साकारले. विश्वचषक स्पध्रेत सचिनने ४५ सामन्यांत ५६.९५च्या सरासरीने २२७८ धावा करून सर्वाधिक धावांचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
२००३च्या विश्वचषक स्पध्रेत सचिनने ६७३ धावा काढून स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळवला होता. त्या स्पध्रेत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

‘‘प्रत्येक नव्या विश्वचषकात त्याची उत्कंठा वृद्धिंगत होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ही राष्ट्रे त्यांच्या क्रीडा संस्कृतीसाठी ओळखली जातात. क्रिकेटच्या चांगल्या सुविधा आणि खेळाची माहिती असलेले सुजाण चाहते, ही या राष्ट्रांची वैशिष्टय़े आहेत,’’ असे सचिनने सांगितले.
‘‘विश्वचषक उंचावणे, हे प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यामुळे विश्वचषक स्पध्रेत अनेक खेळाडू आणि संघांची चांगली कामगिरी पाहायला मिळेल,’’ अशी आशा सचिनने प्रकट केली.

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचा मला दुसऱ्यांदा सदिच्छादूत करण्यात आले, हा मी माझा गौरव समजतो. गेल्या सहा स्पर्धात खेळल्यानंतर आगामी विश्वचषक हा माझ्यासाठी निराळा असेल. कारण मैदानाबाहेरून मी इतरांना खेळताना पाहात असेन. मी १९८७च्या आयसीसी विश्वचषकाशी त्याची तुलना करेन. जेव्हा मी ‘बॉल बॉय’ असल्यामुळे प्रत्येक चेंडूला टाळ्या वाजवायचो.
– सचिन तेंडुलकर