टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याच्या खेळाडूंनी भरपूर प्रगती केली आहे. येथे डेव्हिसच्या लढतीचे आयोजन मिळाले हे त्याचेच प्रतीक आहे. या लढतीद्वारे केवळ पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील टेनिसला आणखी चालना मिळणार आहे, असे ज्येष्ठ डेव्हिसपटू व माजी राष्ट्रीय प्रशिक्षक नंदन बाळ तसेच ज्येष्ठ डेव्हिसपटू शशी मेनन यांनी सांगितले.

मेनन यांनी १९७४ मध्ये पुण्यात झालेल्या रशियाविरुद्धच्या डेव्हिस लढतीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या लढतीत भारताला ३-१ असा विजय मिळाला होता. या लढतीविषयी मेनन म्हणाले, ‘‘मी पुण्यातील रहिवासी असल्यामुळे व माझा हा पहिलाच सामना असल्यामुळे या लढतीबाबत मला खूप उत्कंठा निर्माण झाली होती. या सामन्यात आम्हाला विजय मिळाल्यानंतर चाहत्यांनी आमचे प्रचंड कौतुक केले होते.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘अमृतराज बंधू, रामनाथन कृष्णन या माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांकडून मला खूप काही शिकावयास मिळाले. त्या वेळचे वातावरण अतिशय भारावलेले होते. या वातावरणाचा पुन्हा आनंद घेण्याची संधी पुणेकरांना या आठवडय़ात मिळणार आहे.’’

बाळ यांनी डेव्हिस संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे, तसेच भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही अनेक वर्षे काम केले आहे. ते म्हणाले, ‘‘डेव्हिस स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजपर्यंत अनेक वेळा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आम्ही कायमच या लढतींकडे गांभीर्याने पाहिले आहे. या सामन्यांचे आयोजन करण्याची संधी मिळणे हीदेखील अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या शहरास ४३ वर्षांनी हा मान मिळाला आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘एरवी भारतात अन्य शहरांमध्ये डेव्हिसचे सामने होतात, त्यापेक्षा येथे कमालीचे उत्साहपूर्ण वातावरण पाहावयास मिळत आहे. नवी दिल्ली येथील सामन्यांच्या वेळी प्रेक्षकांनी यावे, यासाठी विनंती करावी लागते. पुण्यात मात्र पावणेचार हजार प्रेक्षकांची क्षमता असलेली गॅलरी पूर्ण भरून जाईल असा अंदाज आहे.’’

गौरव नाटेकर, संदीप कीर्तने व नितीन कीर्तने या पुण्याच्या माजी डेव्हिसपटूंनीही येथील लढतींबाबत गौरवोद्गार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘डेव्हिस स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणेदेखील आव्हानात्मक असते. सुदैवाने आम्हाला ही संधी मिळाली हे आमचे भाग्यच आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पुण्याने टेनिसमधील केलेल्या प्रगतीचेच हे द्योतक आहे.’’