इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीगमधील कोणत्याही फ्रँचायजींनी माघार घेतलेली नाही, तसेच स्पर्धेच्या प्रसारणासाठी एका अग्रगण्य वाहिनीला करारबद्ध करण्यासाठी हालचाली सुरू असून, ही लीग नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे लीग प्रवर्तक आणि भारताचा टेनिसपटू महेश भूपतीने स्पष्ट केले.
पीव्हीपी या लीगमधील एका फ्रँचायजीने माघार घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत झळकले होते. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचे भूपतीने सांगितले. मुंबईच्या संघाचे मालकत्व मायक्रोमॅक्स संघाकडे आहे. सचिन तेंडुलकरसह पीव्हीपी समूह संघाच्या मालकीसाठी उत्सुक होता, मात्र निर्धारित वेळेत ते कागदपत्रांची पूर्तता करू शकले नाहीत.
टेनिस लीगच्या रचनेनुसार टेनिसपटूंना नियमित वेळी पैसे देणे फ्रँचायजींना अनिवार्य आहे. पीव्हीपी समूह आंध्र प्रदेशातील निवडणुकांमध्ये व्यस्त होता. खेळाडूंना पैसे देण्यात अडथळा निर्माण झाला असता. त्यामुळे आम्ही उपलब्ध फ्रँचायजींच्या पर्यायाचा विचार केला. पीव्हीपीशी माझा सातत्याने ई-मेलच्या माध्यमातून संपर्क होत होता.
मायक्रोमॅक्सने दिल्लीची निवड केल्याने त्यांच्या संघाच्या लढती दिल्ली येथे होणार आहेत. ‘‘फ्रँचायजींनी माघार घेतल्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे आणि रागाला निमंत्रण देणारे आहे. सगळ्या गोष्टी सुरळीतपणे सुरू आहेत. विम्बल्डनपूर्वी फ्रँचायजींनी आपापल्या खेळाडूंसह चर्चासत्र आयोजित केले होते. त्यानुसार मायक्रोमॅक्स संघाने राफेल नदालची तर दुबईच्या संघाने नोव्हाक जोकोव्हिचची भेट घेतली होती,’’ असे भूपतीने सांगितले.
इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीगमध्ये खेळणारे खेळाडू फक्त या लीगशीच बांधील असतील, असे भूपतीने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच भूपतीच्या लीगशी स्पर्धा नसल्याचे चॅम्पियन्स लीग टेनिसचे निर्माते विजय अमृतराज यांनी सांगितले होते. भूपतीच्या लीगमधील बोरिस बेकर आणि गोरान इव्हानसेव्हिक हे अमृतराज यांच्या लीगमध्येही खेळणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्याबाबत विचारले असता भूपती म्हणाला, ‘‘भारतीय टेनिससाठी चॅम्पियन्स लीग चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांच्याकडे कोणते खेळाडू आहेत याची मला कल्पना नाही. आमच्या लीगमध्ये खेळणारे खेळाडू फक्त याच लीगमध्ये खेळू शकतील.’’