News Flash

नदाल, ओस्तापेन्को आणि रोहन…

नदालने कारकीर्दीत दहाव्यांदा तर ओस्तापेन्कोने विसाव्या वर्षी पहिल्यांदाच फ्रेंच ओपन जिंकली आहे.

नदालने कारकीर्दीत दहाव्यांदा तर ओस्तापेन्कोने विसाव्या वर्षी पहिल्यांदाच फ्रेंच ओपन जिंकली आहे. आपल्या रोहन बोपण्णाने ३७ व्या वर्षां ग्रॅण्ड स्लॅम जिंकण्याची कौतुकास्पद कामगिरी करून दाखवली आहे.

रोलँड गॅरोसवरील लाल मातीची टेनिस कोर्ट्स ही मुलखावेगळी मानली जातात. एरवी वेगवान व बिनतोड सव्‍‌र्हिस तसेच परतीचे घणाघाती फटके असा खेळ करणाऱ्या खेळाडूंना येथे खेळणे अवघड जाते.

अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये हुकमत गाजविणाऱ्या खेळाडूंना येथे पहिल्या फेरीतही पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच फ्रेंच स्पर्धेत हुकमत गाजविणे अशक्य मानले जाते. मात्र स्पॅनिश खेळाडू नदाल याने केवळ एकदा नव्हे तर दहा वेळा ही स्पर्धा जिंकून आपण लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट असल्याचे सिद्ध केले आहे. त्यातही अनेक युवा व नवोदित खेळाडू आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात आश्चर्यजनक कामगिरी करीत असताना त्याचे हे यश अतिशय अतुलनीय आहे. यंदा त्याने विजेतेपद मिळविताना एकही सेट गमावला नाही यावरून त्याचा अव्वल दर्जा सिद्ध होतो.

नदाल याच्या यंदाच्या विजेतेपदाला आणखी एक वेगळी किनार आहे. ती म्हणजे गतवर्षी याच स्पर्धेतून त्याला मनगटाच्या दुखापतीमुळे तिसऱ्या फेरीतच माघार घ्यावी लागली होती. त्याची टेनिस कारकीर्दच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्याने वैद्यकीय उपचारांना नियमित व्यायाम व सरावाची जोड दिली. त्यामुळेच तो पुन्हा मैदानावर उभा राहू शकला. यंदाच्या विजेतेपदात त्याच्या मार्गात प्रामुख्याने नोवाक जोकोवीच, अँडी मरे, स्टॅनिस्लास वॉवरिंक तसेच डॉमिनिक थिएम यांचे अडथळे होते. त्यापैकी जोकोवीच याला उपांत्यपूर्व फेरीतच थिएमकडून पराभव स्वीकारावा लागला. थिएम याने फ्रेंच स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोम मास्टर्स स्पर्धेत नदाल याचा दोन सेट्समध्ये धुव्वा उडविला होता. त्यामुळेच फ्रेंच स्पर्धेतील उपांत्य फेरीत नदालविरुद्ध पुन्हा विजय मिळविणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तथापि फ्रेंच स्पर्धेत आपण चार पावसाळे पाहिले आहेत. येथे विजय मिळविणे हा चमत्कार नसतो याचाच प्रत्यय घडवत नदाल याने त्याचा सपशेल धुव्वा उडविला.

वॉविरकाने २०१५ मध्ये येथे विजेतेपद मिळविले होते. त्यामुळेच अंतिम फेरीत तो नदालचा झंझावत रोखू शकेल अशी शक्यता वाटत होती. त्यातही त्याने उपांत्य फेरीत मरे याला पाच सेट्सच्या लढतीनंतर हरविले होते. या पाश्र्वभूमीवर अंतिम फेरीत त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र फ्रेंच स्पर्धेत नदाल याचा धडाकेबाज खेळ कोणीही रोखू शकत नाही हेच पाहावयास मिळाले. फोरहँड व बॅकहँडचे दुहेरी फटके, क्रॉसकोर्ट फटके, बेसलाइनवरून व्हॉलिज, नेटजवळून प्लेसिंग, बिनतोड सव्‍‌र्हिस या सर्वच शैलीबाबत नदाल याने वॉविरक याचा सपशेल पाडाव केला.

रोहनचे संस्मरणीय विजेतेपद

इच्छाशक्तीला कौशल्य व चातुर्याची जोड दिली तर विजेतेपदाच्या मार्गात वयाचा अडथळा येत नाही. भारताचे टेनिसपटू प्रौढ वयातही  ग्रँड स्लॅमसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये विजेतेपदावर मोहोर नोंदवत असतात. महेश भूपती, लिअँडर पेस, सानिया मिर्झा यांच्यापाठोपाठ रोहन बोपण्णा यानेही ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे स्वप्न साकार केले, तेही ३७ व्या वर्षी. व्यावसायिक टेनिसपटू एकवेळ ऑलिम्पिक स्पर्धेस महत्त्व देणार नाही मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व प्रतिष्ठेची असते. ऑलिम्पिक किंवा आशियाई स्पर्धामधील कामगिरीचा आंतरराष्ट्रीय मानांकनाबाबत विचार होत नाही. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धामधील कामगिरीचा मानांकन गुणासाठी उपयोग होत असतो. ग्रँड स्लॅम स्पर्धेतील मुख्य फेरीत स्थान मिळविलेल्या प्रत्येक खेळाडूला आर्थिक मोबदल्याची हमी असते. त्यामुळेच ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी प्रत्येक खेळाडू कसोशीने प्रयत्न करीत असतो. पेस याने १९९६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते. हा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंना कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकेरीत अव्वल यश मिळविता आलेले नाही. किंबहुना, भारतीय खेळाडूंना ग्रँड स्लॅम स्पर्धेतील वरिष्ठ गटात फक्त दुहेरीतच चमक दाखविता आली आहे. भूपती व पेस यांनी पुरुषांच्या दुहेरीत अनेक स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले. त्यांनी विविध सहकाऱ्यांसमवेत पुरुष दुहेरी व मिश्रदुहेरीतही अव्वल कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे सानिया मिर्झा हिला देखील एकेरीत कधीही चमक दाखविता आलेली नाही. ती दुहेरीचीच खेळाडू म्हणून ख्यातनाम आहे. तिच्या नावावरही ग्रँड स्लॅमची अनेक विजेतेपदे आहेत. बोपण्णा हा जरी गेली अनेक वर्षे व्यावसायिक स्पर्धामध्ये भाग घेत असला तरी त्याला ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविता आले नव्हते. २०१० मध्ये त्याने पाकिस्तानचा एहसाम उल हक कुरेशी याच्याविरुद्ध अमेरिकन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाचे स्वप्न त्याने नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत साकार केले. त्याने कॅनडाच्या ग्रॅब्रिएला दाब्रोवस्की हिच्या साथीत मिश्रदुहेरीत अजिंक्यपद पटकाविले. फ्रेंच ओपन स्पर्धा ही क्ले कोर्टवर होत असते व या कोर्टवर अनेक मातब्बर खेळाडूंना अव्वल कामगिरी करता आलेली नाही. तसेच, बोपण्णा हा ३७ वर्षांचा खेळाडू आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार केल्यास बोपण्णाचे यश खरोखरीच अभिमानास्पद आहे. फोरहँड व बॅकहँडचे फटके, बेसलाइनवरून व्हॉलीज, नेटजवळून प्लेसिंग तसेच बिनतोड सव्‍‌र्हिस अशी विविधता त्याच्याकडे आहे. त्याचप्रमाणे कोर्टवर चतुरस्र खेळ करण्यासाठी आवश्यक असणारे चापल्य व आत्मविश्वास याबाबतही त्याचा आदर्श युवा खेळाडूंनी घेतला पाहिजे. भारताच्या पुरव राजा व दिविज शरण यांनी पुरुषांच्या दुहेरीत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली.

अनुभवापेक्षा काही वेळा युवा खेळाडूंमधील चापल्यच श्रेष्ठ ठरते याचा प्रत्यय घडवीत लाटवियाच्या ओस्तापेन्को हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न साकार केले. अंतिम फेरीत तिने तृतीय मानांकित सिमोना हॅलेप हिच्याविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर संयमपूर्ण खेळास चतुरस्र खेळाची जोड दिली व विजयश्री खेचून आणली. ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी ती लाटवियाची पहिलीच खेळाडू ठरली आहे. दोन तासांच्या या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडूंनी अव्वल दर्जाचा खेळ करीत चाहत्यांना खेळाचा आनंद मिळवून दिला. सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा यांच्या अनुपस्थितीत युवा महिला खेळाडूंना येथे वर्चस्वाची संधी होती. ओस्तापेन्को हिने केवळ विसाव्या वर्षी फ्रेंच स्पर्धेतील विजेतेपदाचा मुकुट परिधान करीत अन्य युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.

फ्रेंच स्पर्धेपाठोपाठ लगेचच दोन आठवडय़ांनी विम्बल्डन स्पर्धेसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा होत असते. विम्बल्डन स्पर्धा ग्रासकोर्ट्सवर होत असल्यामुळे  लाल मातीवरून पुन्हा ग्रासकोर्ट्स हा प्रवास म्हणजे खेळाडूंना आव्हानात्मक असते. फ्रेंच स्पर्धेत वर्चस्व गाजविणाऱ्या खेळाडूंसाठी विम्बल्डनमध्ये वर्चस्व गाजविणे ही सत्त्वपरीक्षाच असते. अर्थात विम्बल्डनची नजाकत काही वेगळीच असते. एकदा तरी विम्बल्डन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली पाहिजे हे प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहत असतो. हे स्वप्न उराशी धरून तो मेहनत करीत असतो. मुख्य फेरीत नाही तर किमान पात्रता फेरीत संधी मिळाली तरी जीवनाचे सार्थक झाले असेच तो समाधान मानतो. भारतीय खेळाडूंनी ग्रँड स्लॅम स्पर्धामधील एकेरीवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. दुहेरीपेक्षाही एकेरीतील कामगिरीवरच खेळाडूचे श्रेष्ठत्व सिद्ध होत असते. गेल्या दहा वर्षांमध्ये भारतात आंतरराष्ट्रीय मानांकन गुणांच्या भरपूर स्पर्धा होत आहेत. खेळाडूंनाही चांगल्या सवलती मिळत आहेत. युवा खेळाडूंनी मर्यादित यशावर अवलंबून न राहता अधिकाधिक मोठे यश मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भूपती, पेस, बोपण्णा, सानिया मिर्झा यांच्यासारखे यश आपल्याला मिळवायचे आहे हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवीत त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरीला शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची जोड दिली पाहिजे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:03 am

Web Title: tennis nadal ostapenko and rohan
Next Stories
1 रविवारी ठरणार सुपर संडे!, भारत-पाकचे संघ दोनदा मैदानात भिडणार
2 ICC Champions Trophy 2017 : मास्टर ब्लास्टरच्या विक्रमानंतर धवनची गांगुलीच्या विक्रमाला गवसणी
3 सायनापाठोपाठ सिंधूही इंडोनेशियन ओपनमधून बाहेर
Just Now!
X