ब्रिटनचा स्टार टेनिसपटू अँडी मरेने दुखापतीमुळे मियामी ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. आयोजकांनी याबाबत माहिती दिली. मियामी ओपनमध्ये 28-9 असा विक्रम असलेल्या 33 वर्षीय मरेने 2009 आणि 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत 118व्या स्थानावर असलेल्या मरेला या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला होता.

यापूर्वी 23 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारी अमेरिकेची सेरेना विल्यम्स, नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याने सेरेनाने ही स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेली सेरेना मियामी ओपन स्पर्धेत आठ वेळा विजेती ठरली आहे. तिने 2015, 2014, 2013, 2008, 2007, 2004, 2003 आणि 2002मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.

जोकोविच, फेडरर, नदालची माघार

जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोविचने या स्पर्धेत न खेळण्याची घोषणा केली आहे. त्याने ट्विटरवर याबाबत माहिती दिली. मियामी ओपनमध्ये क्वारंटाइनसंबंधित अतिशय कठोर नियम आहेत. त्यामुळे जोकोविच आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवू इच्छित आहे. रॉजर फेडररने येत्या मोसमातील मोठ्या स्पर्धांसाठी आपल्या फिटनेसवर काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. दुखापतीतून पुनरागमन करण्यासाठी राफेल नदालनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.