डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा

इटलीविरुद्धच्या लढतीला शुक्रवारपासून प्रारंभ

कोलकाताच्या साऊथ क्लब ग्रासकोर्टवर इटलीविरुद्धच्या डेव्हिस चषक पात्रता फेरीच्या सामन्यांना शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्या सामन्यांसाठी भारतीय संघाला जे काही हवे होते, त्याप्रमाणे सारे काही मिळाले आहे. त्यामुळे भारतीय टेनिसपटूंनी कोणतीही कारणे देत न बसता विजयाचा ध्यास घ्यावा, असे आवाहन भारतीय संघाचा न खेळणारा कर्णधार महेश भूपती याने केले आहे.

सामन्यांना प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला भूपती यांनी केलेल्या वार्तालापमध्ये भारताला इटलीविरुद्ध जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी असल्याचे सांगितले. ‘‘ हार्ड कोर्ट आणि मातीचे कोर्ट ही इटलीची बलस्थाने आहेत. मात्र, हे सामने हिरवळीवर होणार असल्याचा फायदा भारतीय संघाला मिळू शकणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आता कोणतीही कारणे देता येणार नाहीत, हे लक्षात घ्यावे. भारतीय संघासाठी डेव्हिस चषकातील सामन्यांचे छोटे केलेले स्वरूप अधिक लाभदायक ठरेल. मोठय़ा संघाला किंवा मोठय़ा प्रतिस्पध्र्याना हरवण्यासाठी पाचातील तीन सेट जिंकण्यापेक्षा केवळ दोन सेट जिंकून सामना जिंकणे अधिक सुलभ असते. १९८५ साली विजय अमृतराज आणि सहकाऱ्यांनी जागतिक गटाच्या पहिल्या फेरीत जशी विजयी कामगिरी केली, तशीच कामगिरी भारतीय संघ पुन्हा एकदा करुन दाखवील. भारतीय खेळाडूंमध्ये विजय मिळवण्याची क्षमता आहे, ’’ असा विश्वास भूपती यांनी व्यक्त केला.

नोव्हेंबर महिन्यात माद्रिदला होणाऱ्या १८ देशांच्या अंतिम फेरीतील पात्रतेसाठी भारताला इटलीविरुद्ध सामने खेळून पात्र व्हावे लागणार आहे. जागतिक गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये इटलीला फ्रान्सविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने त्यांनाही भारताविरुद्ध विजय अत्यावश्यक आहे. भारताने आतापर्यंत इटलीवर डेव्हिस चषकात ४-१ असा विजय मिळवला आहे.