भारताच्या सुमित नागल याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार खेळ करून स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला विजयासाठी चांगलेच झुंजवले. सुमितने त्याच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला स्वप्नवत सुरूवात केली होती. त्याने पहिल्याच सेटमध्ये टेनिसचा राजा असलेल्या फेडररला ६-४ असे पराभूत केले होते. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने सुमितविरूद्धचा सामना जिंकला खरा पण या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीचे तोंडभरून कौतुक करण्यात आले.

स्वत: रॉजर फेडरर यानेही त्याचे कौतुक केले. सुमितला उज्वल भविष्य आहे, अशा शब्दात त्याने त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली. “सुमितला माहिती आहे की टेनिस कोर्टवर तो काय कमाल करू शकतो. त्यामुळे त्याचे टेनिसमधील भविष्य उज्वल आहे असे मला मनापासून वाटते. टेनिस या खेळात फार मोठे चमत्कार किंवा धक्कादायक प्रकार घडत नाहीत. या खेळात सातत्याला महत्व आहे. त्याने आजच्या सामन्यात आप्रतिम खेळ करून दाखवला”, अशा शब्दात फेडररने त्याचे कौतुक केले.

“आलेल्या प्रसंगाला त्या क्षणाला कशाप्रकारे सामोरे जावे हे सुमितला चांगले कळते. त्याचा हा गुण चांगला आहे. तुम्ही कितीही स्वप्न पाहिली असतील तरीही मोठ्या स्पर्धांमध्ये येऊन उत्तम कामगिरी करणे अजिबातच सोपे नसते. पण त्याने केलेली कामगिरी खूपच उल्लेखनीय होती. टेनिस खेळताना कामगिरीत सातत्य राखणे आणि चेंडू टोलवताना करण्यात येणाऱ्या हालचाली यात तो निपुण आहे”, असेही फेडररने सांगितले.