News Flash

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे..

यंदाच्या वर्षांत टेनिसविश्वात अनेक नवे प्रवाह रुजले. पुनरागमनाचा वस्तुपाठ राफेल नदालने घालून दिला तर रॉजर फेडररच्या कारकिर्दीला लागलेली उतरती

| December 23, 2013 02:42 am

यंदाच्या वर्षांत टेनिसविश्वात अनेक नवे प्रवाह रुजले. पुनरागमनाचा वस्तुपाठ राफेल नदालने घालून दिला तर रॉजर फेडररच्या कारकिर्दीला लागलेली उतरती कळी टेनिसरसिकांना क्लेषदायी ठरली. याव्यतिरिक्त हे वर्ष ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’चा प्रत्यय देणारे ठरले. सेरेना विल्यम्सला अजून तरी सक्षम पर्याय महिला टेनिसमध्ये नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे हे नव्या युगाचे शिलेदार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. याचप्रमाणे चाळिशीतही उत्साह आणि ऊर्जेचे विलक्षण उदाहरण असलेल्या पेसने ग्रँड स्लॅम विजेतेपदाचा चमत्कार घडवला. भारतीय टेनिसपटूंचे सातत्यपूर्ण प्रदर्शन ही सरत्या वर्षांतील सकारात्मक वाटचाल आहे. मारियन बाटरेलीच्या निमित्ताने ग्रँड स्लॅम जेतेपद सोपे होऊ शकते, याचा प्रत्यय आला. टेनिसचे पैलू उलगडणाऱ्या अनेकरंगी आणि अनेकढंगी छटांची या वर्षांने क्रीडारसिकांना अनुभूती दिली.
फेडरर परिघाबाहेर
यंदाच्या वर्षांत रॉजर फेडरर हा टेनिससम्राट परिघाबाहेर फेकला गेला आहे. ग्रँड स्लॅम जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या फेडररला २०१३ मध्ये एकाही ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा करता आला नाही. जेतेपद दूरचीच गोष्ट, परंतु ज्या कलात्मक आणि दर्जेदार खेळासाठी फेडरर ओळखला जातो, तो पाहायला न मिळण्याचे दु:ख टेनिसरसिकांसाठी वेदना देणारे होते. जागतिक क्रमवारीत अव्वल शंभरातही नसलेल्या खेळाडूंकडून त्याचा पराभव झाला. विम्बल्डनच्या आवडत्या हिरव्यागार (ग्रास) कोर्टवर दुसऱ्याच फेरीत त्याला गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत असंख्य वर्षे अव्वल स्थानावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या फेडररची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
लोटेंगे जी जान से..
मोठे यश हवे असेल तर झगडणेही तितकेच जास्त असते आणि नैराश्यही, याची प्रचीती ‘लाल बादशाह’ राफेल नदालला आली. आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंच्या आयुष्यात असंख्य चढउतार असतात, मात्र काही वेळा हे उतार तीव्र होतात. महान टेनिसपटूंच्या मांदियाळीकडे कूच करणाऱ्या नदालच्या गुडघ्यांनी असहकार पुकारला. कोणत्याही टेनिसपटूसाठी आणि खासकरून मॅरेथॉन सामने खेळण्याची सवय असलेल्या नदालसाठी हे चिंताजनक होते. गेल्या वर्षी जूनमध्ये नदालचे गुडघ्याचे दुखणे उद्भवले. अगदीच असह्य झाल्यावर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. उपचार सुरू झाले, गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली. योग्य वेळी त्याने सरावाला सुरुवात केली. सदैव पाठीशी ठामपणे उभी असणारी घरची मंडळी आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या चमूने त्याच्यासाठी पुनरागमनाचा कार्यक्रम तयार केला. प्रायोजकांचा दबाव, क्रमवारीतील स्थान या कशाच्याही मोहाने घाईघाईत पुनरागमन करणे धोकादायक ठरले असते, म्हणूनच नदालने परतण्यासाठी सात महिन्यांचा अवधी घेतला. मग आवडत्या लाल मातीवर अर्थात फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या विक्रमी आठव्या जेतेपदावर त्याने कब्जा केला. एका विशिष्ट ग्रँड स्लॅम स्पध्रेचे आठवे जेतेपद पटकावणारा नदाल पहिला टेनिसपटू ठरला. विम्बल्डनमध्ये सलामीच्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्यानंतर नदालने आणखी जिद्दीने प्रयत्न करत अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.
बाटरेलीचा उदयास्त
रंगीबेरंगी निरागस फुलपाखरू हळुवारपणे घरात यावे, थोडा वेळ बागडावे आणि क्षणार्धात ते घराबाहेर जावे, अशा पद्धतीने फ्रान्सच्या मारियन बाटरेलीचा प्रवास झाला. चारचौघींमध्ये गणना होणाऱ्या बाटरेलीने विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. बिगरमानांकित बाटरेलीने स्पर्धेत अपराजित राहत अविश्वसनीय वाटावे असे यश मिळवले. या जेतेपदाने तिची दखल घेतली जाऊ लागली होती तोपर्यंत तिने निवृत्तीदेखील घेतली. दुखापतींना कंटाळून तिने निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र तिच्या यशाने सर्वसाधारण खेळाडूही यशोशिखर गाठू शकतो, हे दाखवून दिले.
पेसरूपी चमत्कार
आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचे नाव चमकते ते प्रामुख्याने दुहेरी प्रकारात. वर्षांनुवर्षे ही पताका समर्थपणे सांभाळणाऱ्या चाळिशीतल्या युवा पेसने यंदा चमत्कारच घडवला. चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेकच्या साथीने खेळताना पेसने अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरणारा तो सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला. देशात टेनिसला पोषक वातावरण नसताना, कार्यापेक्षा कुरबुरींमध्ये अडकलेली संघटना अस्तित्वात असताना पेसने मिळवेलेले जेतेपदाचे महत्त्व अनोखे आहे. चाळिशी हा आयुष्यातील परीक्षेचा कालखंड समजला जातो, परंतु पेसने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे.
भारतीय टेनिसने कात टाकली
२०१२ च्या ऑलिम्पिक वर्षांत बंडाळ्यांनी ग्रासलेल्या भारतीय टेनिसमध्ये यंदा काही सकारात्मक गोष्टी पाहायला मिळाल्या. खेळापेक्षा वादविवादांमध्ये असणाऱ्या सानिया मिर्झाने बीजिंग, टोकियो, न्यू हॅवन आणि दुबई अशा चार स्पर्धामध्ये विजेतेपदाची किमया साधली. अथक मेहनत, प्रचंड सराव याच्या बळावर सानियाने मिळवलेले हे यश देशभरातील टेनिसपटूंसाठी प्रेरणादायी आहे. रोहन बोपण्णाने टोकियो आणि मर्सेइल्ले स्पर्धाची अजिंक्यपदे नावावर केली. गेल्या वर्षी कोणासोबत खेळायचे, यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बोपण्णाने फक्त खेळावरच लक्ष केंद्रित केल्याने त्याला हे यश मिळाले. पेसप्रमाणे चाळिशी गाठलेल्या महेश भूपतीने दुबई स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई करत अजूनही आपण स्पर्धात्मक टेनिससाठी तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले. पुरव राजा आणि दिविज शरण जोडीने जपानमधील क्योटो आणि कोलंबियातील बोगोटा स्पर्धेत जेतेपद प्राप्त केले. पुरवने जीवन नेंदुचेझियानच्या साथीने खेळताना एफ-१० स्पर्धाही जिंकली. अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे आणि प्रेरणा भांब्री या महिला टेनिसपटूंनी वर्षभरात चमकदार कामगिरी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 2:42 am

Web Title: tennis sky short in front of aspirations
Next Stories
1 फिफा क्लब विश्वचषकावर बायर्न म्युनिकचा कब्जा
2 रितुपर्णा, श्रीकांत अंतिम फेरीत
3 सव्‍‌र्हिस सुधारण्यावर भर देतोय -लिएण्डर पेस
Just Now!
X