05 June 2020

News Flash

हॉकी इंडियाची इच्छा असेल तर मी परत येईन -वॉल्श

हॉकी इंडियाची इच्छा असेल व त्यांनी योग्य मार्ग काढला तर मी भारतीय हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार आहे, असे माजी प्रशिक्षक टेरी

| November 26, 2014 04:44 am

हॉकी इंडियाची इच्छा असेल व त्यांनी योग्य मार्ग काढला तर मी भारतीय हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार आहे, असे माजी प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना कळविले आहे.
‘‘मी रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपर्यंत प्रशिक्षक म्हणून काम करण्यास तयार आहे, मात्र हॉकी इंडियाने माझ्यासाठी सन्माननीय तोडगा काढावा, असे वॉल्श यांनी म्हटले आहे. वॉल्श यांनी पर्थ येथून सोनोवाल यांना हे पत्र पाठविले आहे.
दक्षिण कोरियात यंदा झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १६ वर्षांनी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर भारतात परतल्यानंतर लगेचच वॉल्श यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय क्रीडा प्राधिकरण व हॉकी इंडिया यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती, मात्र त्यामधून कोणताही मार्ग न निघाल्यामुळे वॉल्श यांनी राजीनामा मागे घेतला नाही. वॉल्श हे अमेरिकन हॉकी संघाबरोबर असताना तेथे झालेल्या भ्रष्टाचारात त्यांचा मोठा वाटा होता, असा आरोप हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी केला होता. मात्र वॉल्श यांनी हे आरोप फेटाळले होते. हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर असलेले मतभेद हाच वॉल्श यांच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. तथापि, सोनोवाल यांनी वॉल्श यांचे खूप कौतुक केल्यामुळे आता हॉकी इंडियापुढेच पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
‘‘सोनोवाल यांच्याप्रमाणेच संघातील खेळाडूंनी मला खूप चांगले सहकार्य केले आहे व जर त्यांनी असाच दृष्टिकोन ठेवला तर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भवितव्य आहे,’’ असे वॉल्श यांनी सांगितले. वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने आशियाई सुवर्णपदक मिळवत रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेशही निश्चित केला. त्याआधी त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.

आम्हाला वॉल्शची गरज नाही -बात्रा
नवी दिल्ली : टेरी वॉल्श यांनी पुन्हा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी हॉकी इंडियाला आता त्यांची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी त्यांना इशारा दिला आहे. ‘‘वॉल्श यांची आता आम्हाला गरज भासत नाही. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर आम्ही नव्या प्रशिक्षकाचा शोध घेणार आहोत,’’ असे बात्रा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 4:44 am

Web Title: terry walsh ready to return but wants hockey india to show desire
टॅग Hockey,Hockey India
Next Stories
1 पहिल्या कसोटीतून क्लार्कची माघार
2 नील नार्वेकरचा २९ चेंडूंत वेगवान शतकाचा पराक्रम
3 कोहलीसह पाच फलंदाजांची अर्धशतके
Just Now!
X