कसोटी क्रिकेट हा अजुनही अनेक चाहत्यांसाठी आस्थेचा विषय आहे. वन-डे आणि टी-२० क्रिकेटच्या जमान्यात कसोटी क्रिकेट तग धरेल का असा सवाल आपण अनेक वर्ष ऐकत आहोत. मात्र आता कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल १४२ वर्षांनी एक बदल होण्याची शक्यता आहे. लवकरच कसोटी क्रिकेटच्या पांढऱ्या पोशाखावर आता खेळाडूंचे क्रमांक आणि नावं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी मी योग्य उमेदवार – उमेश यादव

१८७७ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि क्रमांक टाकले होते. मात्र यानंतर आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकच पद्धत चालत आलेली आहे. २०१९ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या Ashes कसोटी मालिकेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होते आहे. कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढावा यासाठी या बदलाची शिफारस आयसीसीकडे करण्यात आलेली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पोशाखावर त्याचं नाव लिहीलेलं नसल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान, त्यांना ओळखण कठीण होऊन बसतं. त्यातच कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांची रोडावलेली संख्या हा मुद्दा चर्चेत असताना, प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानात खेचून आणण्यासाठी आयसीसी या प्रस्तावाला मान्यता देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. मात्र या शिफारसीवर आयसीसीसीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाहीये.

आयसीसीने नवीन प्रस्तावाला मान्यता दिल्यास, Ashes मालिकेत खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांची नाव व क्रमांक लिहीले जाऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात चाहते या बदलाकडे कसं पाहतात हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.