11 December 2017

News Flash

सचिनच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेट संपेल -रणतुंगा

कसोटी क्रिकेट मृत्युपंथाला पोहोचले असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच त्यात आता श्रीलंकेचे माजी कर्णधार

पीटीआय, बंगळुरू | Updated: February 23, 2013 5:08 AM

कसोटी क्रिकेट मृत्युपंथाला पोहोचले असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच त्यात आता श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी आणखी भर घातली आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर कसोटी क्रिकेट संपूनच जाईल, अशी भीती श्रीलंकेचे विश्वचषक विजेते कर्णधार रणतुंगा यांनी व्यक्त केली आहे.
‘‘सचिनसारख्या महान खेळाडूने कसोटी क्रिकेट खेळणे सोडून दिल्यास कसोटीतील जान हरपून जाईल. त्याने प्रदीर्घ काळ पाचदिवसीय क्रिकेट खेळत जावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करत असतो. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यामुळे मी आनंदी झालो. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे शिक्षण आहे तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट हे मनोरंजन आहे,’’ असे रणतुंगा यांनी सांगितले.
स्थानिक क्रिकेटमध्ये दोन शतकी खेळी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सचिन पुनरागमन करेल का, असे विचारले असता रणतुंगा म्हणाले, ‘‘वयाच्या ३९व्या वर्षीही सचिन भारताच्या युवा क्रिकेटपटूंपेक्षा सरस आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एखादी चांगली खेळी साकारल्यास तो आरामात दोन ते तीन वर्ष क्रिकेट खेळेल.’’
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भेडसावणारे अनेक मुद्दे तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पंचपुनर्आढावा पद्धतीला (डीआरएस) असलेला विरोध पाहता रणतुंगा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) तोंडसुख घेतले. ‘‘भूंकणाऱ्या कुत्र्यासारखी आयसीसीची स्थिती झाली आहे. ते आपली भूमिका कधीही बदलणार नाहीत, हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. आयसीसीने पंचपुनर्आढावा पद्धत सक्तीची करायला हवी. त्यांनी यजमान देशाला याबाबतचा निर्णय घेण्याची परवानगी नाकारावी. कठोर निर्णय घेण्याची क्षमता आयसीसीमध्ये असायला हवी,’’ असेही त्यांनी सांगितले.
‘सरकारी हस्तक्षेप नसलेल्या श्रीलंका
क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष व्हायला आवडेल!’
श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या कारभारात आणि आगामी निवडणुकीत हस्तक्षेप करणार नसल्याचे आश्वासन श्रीलंका सरकारने दिल्यास अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला आवडेल. अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय मी मायदेशात परतल्यानंतरच घेईल, असे मत अर्जुन रणतुंगा यांनी मांडले. पुढील महिन्यात श्रीलंका क्रिकेट मंडळाची नवी कार्यकारिणी निवडली जाणार आहे.

First Published on February 23, 2013 5:08 am

Web Title: test cricket ends after retairement of sachin rantunga
टॅग Cricket,Sports