करोनानंतरच्या काळात कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भारताने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जर भारतानेच कसोटी सामन्यांचे आयोजन करण्याकडे दुर्लक्ष केले, तर कसोटी क्रिकेट संपुष्टात येईल, असा इशारा भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी दिला आहे.

‘‘कसोटी क्रिकेट वाचवण्याची जबाबदारी पूर्णपणे भारतावर आहे, असे मला वाटते. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या संघांनीसुद्धा एकत्र येऊन कसोटी क्रिकेटचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कारण यांसारख्या हातांवर मोजण्याइतपत देशांमध्येच सध्या स्पर्धात्मक कसोटी सामने खेळले जातात. त्यातच ‘बीसीसीआय’ आर्थिकदृष्टय़ाही इतरांपेक्षा सक्षम असल्याने त्यांनी जर कसोटीकडे कानाडोळा केला, तर कसोटी क्रिकेट पूर्णपणे नष्ट होईल,’’ असे चॅपेल यांनी म्हटले आहे.

‘‘ट्वेन्टी-२० सामन्यांत झटपट निकाल लागत असल्याने चाहते आपसूकच त्याकडे खेचले जातात. परंतु येणाऱ्या पिढय़ांना कसोटीचे महत्त्व पटवून देण्यात भारत मोलाची भूमिका बजावू शकतो. भारताचा कोहली स्वत: कसोटी सामन्यांचा मोठा चाहता आहे. त्यामुळे तो नक्कीच कसोटीच्या अस्तित्वासाठी पुढाकार घेईल,’’ असेही चॅपेल यांनी सांगितले.

धोनी सर्वाधिक प्रभावी

महेंद्रसिंह धोनी हा आजवर मी पाहिलेला सर्वाधिक प्रभावी फलंदाज आहे, अशी स्तुतिसुमने चॅपेल यांनी उधळली. ‘‘मी धोनीला ज्या वेळी प्रथम फलंदाजी करताना पाहिले, तेव्हाच आश्चर्यचकीत झालो. त्याच्याइतपत प्रभावशाली फलंदाज मी आजवर पाहिलेला नाही. तांत्रिकदृष्टय़ा सक्षम नसतानाही कोणत्याही वेळी तो षटकार मारू शकतो,’’ असे चॅपेल म्हणाले.