दुखापतीमुळे भारतीय कसोटी संघातील स्थान गमावलेला अष्टपैलू क्रिकेटपटू पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरामगन करणे आव्हानात्मक असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपले महत्त्व जाणत असल्याचे मत पंडय़ाने व्यक्त केले आहे.

हार्दिक पंडय़ा सप्टेंबर २०१८ पासून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. फक्त ११ कसोटी सामने खेळलेल्या पंडय़ाने झटपट क्रिकेटच्या प्रकारात भारतीय संघातील आपले स्थान अबाधित राखले आहे. तो सध्या गेल्या वर्षी पाठीच्या दुखापतीवर केलेल्या शस्त्रक्रियेतून अद्यापही सावरलेला नाही. ‘‘पर्यायी मध्यमगती गोलंदाज म्हणून मी स्वत:च्या भूमिकेकडे पाहत आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर मी पुन्हा कसोटी खेळू शकेन की नाही, माहीत नाही. पण माझ्यासाठी कसोटी क्रिकेट नक्कीच आव्हानात्मक असेल. मी कसोटीपटू असतो तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ठसा उमटवू शकलो नसतो. कसोटी सामने खेळल्यास, माझ्या पाठीची दुखापत पुन्हा उद्भवून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करणार आहे. माझ्यातील ऊर्जा हीच जमेची बाजू असल्यामुळे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकलो,’’ असे पंडय़ाने सांगितले.

२०१८च्या आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंडय़ाला पहिल्यांदा पाठीच्या दुखापतीचा त्रास होऊ लागला. त्याविषयीच्या आठवणींबद्दल पंडय़ाने सांगितले की, ‘‘माझी कारकीर्द संपुष्टात आली असेच मला त्याक्षणी वाटले. वेदना कमी होत नसल्यामुळे आता सर्व संपले असेच वाटत होते. त्यानंतर दुखापतींना घेऊनच माझी क्रिकेटमधील वाटचाल सुरू झाली.’’

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बेंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड यांच्याकडून कसा पाठिंबा मिळतो, असे विचारल्यावर पंडय़ा म्हणाला, ‘‘विराट, रोहित किंवा रवी सर माझ्याकडे येऊन मला शिकवत नाहीत. ते मला नैसर्गिक खेळण्याचे स्वातंत्र्य देतात. संघातील स्थानाबाबत सुरक्षिततेची भावना मनात असल्यामुळेच मी मनमोकळेपणाने फलंदाजी करू शकतो. त्यामुळेच मी स्वत:हून निर्णय घेत असतो. द्रविड सरांचा एक क्रिकेटपटू म्हणून मी आदर करतो. त्यांनी माझ्या काम, मेहनतीविषयी कधीही शंका घेतली नाही.’’