जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. क्रीडा स्पर्धा कधी चालू होणार याची अद्याप कल्पना आलेली नाही. त्यातच सध्या मरणासन्न असलेल्या कसोटी क्रिकेटच्या पुनरूज्जीवनासाठी कितपत प्रयत्न होतील याबाबतही साशंकता आहे. अशा परिस्थितीत भारतच क्रिकेटचा तारणहार आहे, असे मत माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केले आहे.

ICC च्या ट्विटवर सचिन, गांगुलीचा अफलातून रिप्लाय

“भारत हाच कसोटी क्रिकेटचा तारणहार आहे. ज्यावेळी भारत आशा सोडून देईल, तेव्हा कसोटी क्रिकेट संपेल. केवळ भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे तीनच देश सध्या नव्याने क्रिकेटमध्ये येणाऱ्या खेळाडूंना कसोटी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. टी २० क्रिकेटला माझा विरोध अजिबातच नाही. झटपट निकाल लागणारे टी २० क्रिकेटचे सामने चाहत्यांना अधिक आकर्षित करतात. त्यामुळे त्याला प्रायोजक आणि इतर आर्थिक सहकार्य सहज मिळतं. कसोटी क्रिकेट मात्र काहीसं वेगळं आहे. कसोटी क्रिकेटसाठी कोणी पटकन प्रायोजकत्व देण्यास तयार होत नाही. चाहतेदेखील अनेकदा त्याकडे पाठ फिरवतात. भविष्यात ही समस्या वाढताना दिसेल. अशा परिस्थितीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ‘कसोटी क्रिकेट हेच खरं क्रिकेट’ असं म्हणतो म्हणूनच आता भारताकडून आशा आहेत.

दरम्यान, चॅपल हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना त्यांचे अनेकदा खेळाडूंशी खटके उडायचे. सचिनने आपल्या आत्मचरित्रात चॅपल यांचा उल्लेख रिंगमास्टर म्हणून केला आहे. ते स्वतःच्या कल्पना खेळाडूंवर लादायचे. मात्र चॅपल यांच्या काळात एक महत्त्वाची बाब घडली ती म्हणजे धोनीला मॅच-फिनिशर म्हणून नाव मिळाले. चॅपल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक चेंडू मैदानाबाहेर मारायचा प्रयत्न करणारा धोनी शांत आणि संयमी मॅच-फिनिशर बनला.