दिल्लीचे कोटला स्टेडियम अनुपलब्ध

दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला प्रारंभ करणाऱ्या एकदिवसीय सराव सामन्याचे फिरोझशाह कोटला स्टेडियमवर आयोजन करणे शक्य नसल्याचे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केल्यानंतर हा सामना आता पालम येथे हलवण्यात आला आहे.
तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना २ ऑक्टोबरला धरमशाला येथे होणार आहे. त्याआधी २९ सप्टेंबरला पालमला सराव सामना होणार आहे.
विविध प्राधिकरणांकडून परवानगी मिळवण्यात अपयश येत असल्यामुळे सराव सामन्याचे यजमानपद भूषवणे आम्हाला शक्य नाही. अशा आशयाचे पत्र दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिले होते, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष आणि भारताचे माजी सलामीवीर चेतन चौहान यांनी दिली. मात्र ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी स्टेडियम सज्ज असेल, अशी खात्री चौहान यांनी दिली.