कसोटी प्रकारात सातत्याने चमकदार कामगिरी केली असली तरी भविष्यात विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याप्रमाणे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत छाप पाडायची आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख फलंदाज मार्नस लबूशेनने व्यक्त केली.

भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी २५ वर्षीय लबूशेनची प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड करण्यात आली आहे. लबूशेनने २०१९ या वर्षांत कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवतानाच २०२० या वर्षांचीसुद्धा द्विशतकाद्वारे दिमाखदार सुरुवात केली.

‘‘ज्याप्रमाणे अन्य युवा फलंदाज कोहली, स्मिथला आदर्श मानतात, त्याचप्रमाणे मीसुद्धा त्यांच्यासारखाच सर्व प्रकारांत दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. त्याशिवाय जो रूट आणि केन विल्यम्सन हेसुद्धा माझे प्रेरणास्थान आहेत. गेली अनेक वर्षे हे खेळाडू सातत्याने तिन्ही प्रकारांत संघासाठी योगदान देत असून मलासुद्धा भविष्यात ऑस्ट्रेलियासाठी अशीच किमया साधायची आहे,’’ असे लबूशेन म्हणाला.

‘‘भारतातील खेळपट्टय़ांवर प्रथमच खेळताना असंख्य आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु हे आव्हान स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे,’’ असेही लबूशेनने सांगितले.