भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

दक्षिण ऑस्ट्रेलियात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे भारताविरुद्धची मालिका वाचवण्याच्या दृष्टीने ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाने ठोस पावले उचलली आहेत. कसोटी कर्णधार टिम पेन आणि मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज मार्नस लबूशेन यांच्यासही काही खेळाडूंना मंगळवारी अ‍ॅडलेडहून न्यू साऊथ वेल्सला विमानाने स्थलांतरित करीत ‘हवाईसुटका’ केली आहे. यात मॅथ्यू वेड, ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरून ग्रीन यांचाही समावेश आहे.

पश्चिम ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड आणि टास्मानिया यांनी सोमवारी दक्षिण ऑस्ट्रेलियासाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे टेलिव्हिजन प्रक्षेपणाद्वारे ३० कोटी डॉलर अपेक्षित असलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेवर परिणाम होऊ नये म्हणून ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाने कंबर कसली आहे. अ‍ॅडलेडमधील कसोटी, मर्यादित षटकांच्या आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघांमधील क्रिकेटपटूंना मंडळाने सिडनीला आणले आहे.

‘‘देशातील स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक बिघडू नये, याकरिता ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाने गेल्या २४ तासांत अनेक खेळाडूंना स्थलांतरित केले आहे. ही तातडीची निर्णायक कारवाई करण्यासाठी देशपातळीवर अनेक जण गेले ४८ तास कार्यरत आहेत,’’ असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले यांनी सांगितले.

दक्षिण ऑस्ट्रेलियामधील करोनाच्या साथीचा आम्ही आढावा घेत आहोत. करोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरी अ‍ॅडलेड ओव्हलला १७ डिसेंबरपासून भारताविरुद्धची पहिली कसोटी सुरू होईल, यासाठी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ मंडळ प्रयत्नशील आहे, असे हॉकले यांनी सांगितले.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झाला असून २७ नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका असून नंतर तीन ट्वेन्टी-२० सामने आहेत.

संधीचे सोने करीन -पुकोवस्की

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधीचे सोने करीन, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख फलंदाज विल पुकोवस्कीने व्यक्त केला आहे. शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत सलग द्विशतके साकारल्यामुळे भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पुकोवस्कीची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये न खेळताही पुकोवस्कीने तीन डावांमध्ये ४९५ धावा केल्या आहेत. २०१९मध्ये श्रीलंकेविरुद्ध पुकोवस्कीची निवड झाली होती. परंतु मानसिक आरोग्य बिघडल्याने त्याला खेळता आले नव्हते.