भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांना अद्याप टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवता आलेला नाही. त्यामुळेच आता बुधवारपासून सुरू होणाऱ्या थायलंड मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी करून ऑलिम्पिक पात्रता गाठण्याचे आव्हान सायना, श्रीकांतसमोर असणार आहे.

२०१९मधील खराब कामगिरीमुळे सायना आणि श्रीकांतची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) क्रमवारीत अनुक्रमे २२व्या आणि २३व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. बीडब्ल्यूएफच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या नियमानुसार, एकेरीतील फक्त दोनच खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. मात्र पात्रतेसाठी खेळाडूंनी अव्वल-१६ जणांमध्ये स्थान मिळवणे अत्यावश्यक आहे. ऑलिम्पिक पात्रतेची अंतिम मुदत एप्रिलअखेरीस असून तोपर्यंत फक्त आठ स्पर्धा शिल्लक आहेत.

सायनाला पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या लिने होमार्क जार्सफेल्ड हिच्याशी लढत द्यावी लागेल. श्रीकांतची पहिल्या फेरीत शेसार हिरेन हुस्ताविटो याच्याशी गाठ पडेल.