|| ऋषिकेश बामणे

गेल्या रविवारी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरी गटात विजेतेपद मिळवले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे बऱ्याच काळानंतर भारतीय बॅडमिंटनला दुहेरीत दिलासादायी आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आगामी जागतिक अजिंक्यपद आणि पुढील वर्षीच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या दृष्टीने भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

एकीकडे पुरुष व महिला एकेरीत भारताचे रथी-महारथी अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यातही अपयशी होत असताना सात्त्विक-चिराग यांनी मिळवलेले विजेतेपद हे प्रशंसनीय आहे. १९ वर्षीय सात्त्विक आणि २२ वर्षीय चिराग यांच्या जोडीला गतवर्षी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. परंतु त्यांच्या कामगिरीची दखल संपूर्ण विश्वाने घेतली. २०१८ मध्येच मिळवलेले हैदराबाद बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपद, तर सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील उपविजेतेपद सात्त्विक-चिराग यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आणि ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत अमेरिका, चीन या देशांचे अधिक कडवे प्रतिस्पर्धी उभे ठाकतील. त्यांच्याविरुद्ध सात्त्विक-चिराग कशी कामगिरी करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांच्यावर भारताची प्रामुख्याने मदार आहे.

एके काळी अश्विनीच्या साथीने खेळणाऱ्या ज्वाला गट्टाने भारताला अनेक विजेतेपदे मिळवून दिली. या दोघींमुळेच भारतीय बॅडमिंटनच्या दुहेरीचा सुवर्णकाळ सुरू झाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०१०च्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक, २०११च्या जागतिक अजिंक्यपदमध्ये कांस्यपदक आणि २०१४ च्या राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक मिळवण्याबरोबरच त्यांनी सुपर सीरिज स्पर्धामध्येही वर्चस्व गाजवले. मात्र कालांतराने खेळाडू आणि प्रशिक्षकांसंबंधी मतभेदांमुळे ज्वालाने दुहेरीतील स्थान गमवावे लागले. तेथूनच तिच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली व अखेरीस २०१७ मध्ये तिने निवृत्ती जाहीर केली.

मिश्र दुहेरीत सात्त्विक आणि अश्विनी यांची जोडीसुद्धा कमाल करत आहे. २०१८च्या राष्ट्रकुलमध्ये सांघिक प्रकारात मिश्र दुहेरीच्या लढतीत याच जोडीने भारतासाठी विजेतेपद मिळवले. त्यामुळे पुरुष दुहेरीबरोबरच मिश्र दुहेरीतसुद्धा पदकाच्या आशा बळावल्या आहेत.

एकेरीत भारताला ज्या प्रकारे पुलेला गोपीचंद, प्रकाश पदुकोन, अपर्णा पोपट यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंचा वारसा लाभला. मात्र दुहेरीत भारताला असे खेळाडू क्वचितच लाभले. किंबहुना नामांकित माजी खेळाडूंमधूनही दुहेरीतील खेळाडूंच्या भवितव्यासाठी कोणी ठोस पावले उचलली नाहीत. मात्र आता ऑलिम्पिकसाठी एक वर्ष शिल्लक असताना प्रशिक्षकीय चमूत बदल करत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रशिक्षकांना जबाबदारी सोपवून बॅडमिंटन व्यवस्थापनाने दुहेरीकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून कोरियाचे किम जी ह्य़ुंग आणि पार्क ते संग हे भारताच्या पुरुष एकेरीचे, तर इंडोनेशियाचे फ्लँडी लिम्पेले आणि किम टॅन हर दुहेरीत प्रशिक्षकपदाची भूमिका बजावत आहेत. या सर्व सकारात्मक-नकारात्मक बाबींचा विचार केल्यानंतरही पुढील वर्षी जुलैमध्ये रंगणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दुहेरी बॅडमिंटनपटूंकडून भारतीय चाहत्यांना नक्कीच पदकाची आशा करता येईल.

दुहेरीतील खेळाडूंना दुय्यम वागणूक!

दुहेरीतील खेळाडूंना एकेरीतील खेळाडूंच्या तुलनेत कमी लेखणे, या भारतीय बॅडमिंटनमधील वृत्तीविरोधात ज्वाला गट्टाने अनेकदा आवाज उठवला. २०१७मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिकांशिवाय मारुती सुझुकी ही चार चाकी गाडीसुद्धा देण्यात आली, तर दुहेरीतील विजेत्यांना मात्र २५,००० रुपयांवर समाधान मानावे लागले. त्याशिवाय अनेकदा दुहेरीतील खेळाडूंना योग्य प्रक्षिशण देण्यासाठी प्रशिक्षकाचीसुद्धा उणीव जाणवायची. ज्वालाप्रमाणेच अश्विनी, प्रणव चोप्रा यांनीसुद्धा दुहेरीतील खेळाडूंना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीबद्दल नाराजी प्रकट केली आहे.

सात्त्विक-चिराग यांनी थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत मिळवलेले विजेतेपद नक्कीच अभिमानास्पद आहे. परंतु त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून आव्हान आता अधिक बिकट होणार आहे. जागतिक अजिंक्यपद स्पध्रेसाठी सर्व खेळाडू अधिक तयारीने उतरतील. त्यामुळे सात्त्विक-चिराग यांनी हुरळून न जाता अधिक परिश्रम करण्यावर भर द्यावा.  – उदय पवार, चिरागचे प्रशिक्षक.

rushikesh.bamne@expressindia.com