थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा

पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी मंगळवारी सरळ गेममध्ये विजय नोंदवत थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दिमाखदार सलामी नोंदवली. समीर वर्माने जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावरील ली झि जियाला पराभवाचा धक्का दिला.

गेल्या आठवडय़ात आशियाई टप्प्याच्या पहिल्या स्पर्धेत डेन्मार्कच्या मिया ब्लिशफिल्डने पहिल्याच फेरीत जगज्जेत्या सिंधूला पराभवाचा धक्का दिला होता. परंतु त्या धक्क्यातून सावरत सिंधूने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावरील थायलंडच्या बुसानन ओंगबामरूनंगफानला २१-१७, २१-१३ असे नामोहरम केले. या विजयामुळे सिंधूने बुसाननविरुद्ध विजय-पराभवाची आकडेवारी ११-१ अशी उंचावली आहे. सिंधूने २०१९च्या हाँगकाँग खुल्या स्पर्धेत तिच्याविरुद्ध एकमेव पराभव पत्करला होता. ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवालचे मात्र पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. रॅटचानोक इन्थॅनॉन हिने तिचा २१-१७, २१-८ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून सायनाला स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.

पुरुष एकेरीत श्रीकांतने थायलंडच्या सिथिकोम थामासिनला २१-११, २१-११ असे ३७ मिनिटांत पराभूत केले. परंतु जागतिक क्रमवारीत ३१व्या स्थानावर असलेल्या समीरने आठव्या मांनाकित ली याचा १८-२१, २७-२५, २१-१९ असा पराभव केला. सौरभ वर्मालाही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. इंडोनेशियाच्या अ‍ॅन्थनी गिंटिंगने त्याचा २१-१६, २१-११ असा पराभव केला. पारुपल्ली कश्यपने डेन्मार्कच्या रॅसमूस गेम्केविरुद्धची लढत ०-३ अशी पिछाडीवर असताना अर्धवट सोडली. गेल्या स्पर्धेतदेखील त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे आता पुरुष एकेरीत श्रीकांतवरच भारताची प्रामुख्याने मदार आहे.