महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह रमेश देवाडीकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पॅनेलचा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे देवाडीकर यांचे सरकार्यवाहपद अडचणीत आले आहे. मनोज पाटील यांनी २३६ वि. १२२ मतांच्या फरकाने देवाडीकर यांना पराभूत केले, तर देवराम पाटील यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे.
सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत शशिकांत ठाकूर यांनी हरेश्वर कोळी यांचा २०४-१६० असा पराभव केला, तर संयुक्त सचिव पदावर मालोजी भोसले, गणेश म्हात्रे, शंकर पाटील, सुरेश तरे यांची वर्णी लागली आहे.
१९७८पासून देवाडीकर ठाणे जिल्हा असोसिएशनवर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत ते सरकार्यवाह पदावर निवडून आले, त्यावेळी त्यांच्या पॅनेलनेही आपल्या वर्चस्वाची चुणूक दाखवली होती. राज्य कबड्डी असोसिएशनच्या शासकीय समितीची वर्षांतून दोनदा बैठक होते. डिसेंबरमध्ये नाशिकला होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेदरम्यान शासकीय समितीची बैठक होणार आहे. आता ठाणे जिल्ह्याने आपले प्रतिनिधी बदलल्यास देवाडीकर यांची अडचण होऊ शकेल.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्हा आपले तीन प्रतिनिधी निश्चित करतो, त्यामधून कार्यकारिणीची निवड होते. आतापर्यंत अनेकदा जिल्हा संघटनेतील प्रतिनिधी बदलल्यामुळे शासकीय समितीमध्येही हे बदल झाले आहेत. जिल्ह्याचे प्रतिनिधी आठवडय़ाभरात आम्ही निश्चित करू, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची कार्यकारिणी : अध्यक्ष : देवराम भोईर. कार्याध्यक्ष : मनोज पाटील. सरचिटणीस : शशिकांत ठाकूर. संयुक्त सचिव : मालोजी भोसले, गणेश म्हात्रे, शंकर पाटील, सुरेश तरे. कोषाध्यक्ष : अरुण म्हात्रे. सहकोषाध्यक्ष : गणेश जगताप. सदस्य : प्रवीण दळवी, चिंतामणी मगर, मंदार तावडे, प्रकाश शेटय़े, प्रशांत जाधव, राजेंद्र मुलणकर, द्वारकानाथ म्हात्रे, भूषण पाटील, विलास म्हात्रे, प्रेमनाथ पाटील.