विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. न्यूझीलंडने सांघिक कामगिरीच्या जोरावर बलाढ्य भारतीय संघाचा १८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात भारतीय संघाची आघाडीची आणि मधली फळी अपयशी ठरल्यानंतर आठव्या क्रमांकावर आलेल्या जाडेजाने धोनीसोबत १०० धावांची अभेद्य भागिदारी करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात जाडेजा बाद झाला.

जाडेजाने ७७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. सोशल मीडियावर जाडेजावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. तर पराभवानंतर चाहते भारतीय संघाचे मनोबल वाढवत आहेत. अशात रविंद्र जाडेजाने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहे. कधीच हार मानू नये, पराभवनंतर कसं उभं रहायचे हे मला नेहमीच खेळानी शिकवलं आहे. मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच असल्याचे जाडेजा म्हणाला आहे.

उपांत्य सामन्यातील संघाच्या पराभवानंतर भारतीयांच्या विश्वचषकाच्या विजयावर पाणी फिरलं आहे. दोन दिवस चाललेल्या उपांत्य सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा पराभव झाला पण रविंद्र जाडेजाने भारतीयांसोबत विरोधी संघाचीही मनं जिंकली आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननेही सामन्यानंतर जाडेजाच्या खेळीचं कौतुक केलं आहे. जाडेजाने गोलंदाजी करताना दहा षटकांत ३२ धावा देताना एक बळी घेतला. क्षेत्ररक्षण करताना एका फलंदाजाला धावबाद केलं. फलंदाजी करताना महत्वपुर्ण अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. जाडेजाच्या या अष्टपैलू खेळीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

जाडेजाचं ट्विट –
‘कधीच हार मानू नये आणि पराभवानंतरही धीटपणे उभं राहावं हे मला नेहमीच खेळाने शिकवलं. मला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक चाहत्याचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुमचा पाठिंबा असाच राहू द्या, माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी चांगलं खेळण्याचा प्रयत्न करेन’