श्रीशांतशी मोबाईलवर प्रदीर्घ काळ बातचीत करणाऱ्या एक अभिनेत्रीवर आता पोलीस लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या बुकींना मोठय़ा रकमेच्या ‘बेट’ देणाऱ्या बॉलिवूड तारकांची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. या सर्वाना चौकशीसाठी बोलाविले जाणार असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
दिल्ली पोलिसांनी उघड केलेल्या या प्रकरणात आता मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभागही रस घेत आहे. श्रीशांतकडे सापडलेला लॅपटॉप तसेच त्याच्या ब्लॅकबेरी मोबाईलमुळे महत्त्वाची बरीच माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दोन अभिनेत्रींचा समावेश आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा मोबाईल तपशील तपासला जात असला तरी त्यात आक्षेपार्ह काही आढळलेले नाही. मात्र श्रीशांतशी संपर्कात असलेल्या अभिनेत्रीची ओळख पटली आहे. सामना निश्चित करण्याच्या प्रकरणात या अभिनेत्रीचा काही संबंध आहे का वा या अभिनेत्रीची ओळख कशी झाली तसेच अटक केलेल्या बुकींचा संबंध आहे का, आदी बाबींची चौकशी करण्यासाठी या अभिनेत्रीलाही चौकशीसाठी बोलाविण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले.
आयपीएल सामने निश्चित करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या बुकींच्या संपर्कात काही बॉलिवूड अभिनेते असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या अभिनेत्यांनी मोठय़ा प्रमाणात बेट लावल्याची माहिती या बुकींकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी यादी तयार केली आहे. याबाबत अधिक माहिती देण्यास या सूत्रांनी नकार दिला असला तरी वादग्रस्त अभिनेत्याचा भाऊ, दूरदर्शन मालिकेत आघाडीवर असलेल्या निर्मातीचे वडील, एक बुजुर्ग अभिनेते आदींचा प्रामुख्याने समावेश असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले. या सर्वाना गरज भासल्यास चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.