अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू असगर अफगाणला सर्व स्वरूपातील कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) याविषयी माहिती दिली. हशमतुल्ला शाहिदला वनडे आणि कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. टी-२० संघाचा कर्णधार नेमण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मंडळाने म्हटले आहे. टी-२० स्वरूपात राशिद खान उपकर्णधार म्हणून काम करत राहील, तर रहमत शाह कसोटी आणि वनडे स्वरूपात उपकर्णधार म्हणून काम पाहणार आहे.

असगर अफगाणला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय एसीबीच्या चौकशी समितीने केलेल्या तपासणीच्या आधारे घेण्यात आला होता. यात असा निष्कर्ष काढला गेला होता, की संघाचा कर्णधार म्हणून अफगाणने घेतलेल्या काही निर्णयामुळे मार्चमध्ये झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संघाला पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा – फ्रेंच ओपन : दंडात्मक कारवाईनंतर नाओमी ओसाकाची स्पर्धेतून माघार

 

झिम्बाब्वेविरुद्ध अफगाणिस्तानची कामगिरी वाईट म्हणता येणार नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानला १० गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले. दुसर्‍या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने हा सामना ६ गड्यांनी जिंकला होता आणि मालिकाही १-१ अशा बरोबरीत सुटली होती. अफगाणिस्तान संघाने टी-२० मालिकाही खिशात टाकली होती.

हेही वाचा – भारताच्या ‘वर्ल्डकपविजेत्या’ क्रिकेटपटूनं घेतली २८व्या वर्षी निवृत्ती!

आयर्लंडविरूद्धच्या मालिकेवर नजर टाकल्यास अफगाणिस्तानने वनडे मालिकेतील तिन्ही सामने जिंकले. टी-२० मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला. यानंतर दुसरा सामना अफगाणिस्तानने जिंकला, तर तिसर्‍या सामन्यात आयर्लंडने सुपर ओव्हरमध्ये यश मिळवले.