गेल्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची राखरांगोळी करत ३-० असा सफाईदार विजय मिळवला होता. पण ती झालेली राख झटकून नव्याने आग पेटवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या मायदेशातील मालिकेमध्ये उत्सुक असेल. हे मैदान ऑस्ट्रेलियासाठी सुदैवी ठरले असून गेल्या १२३ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाला गाब्बाच्या मैदानात पराभव स्वीकारावा लागलेला नाही.
इंग्लंडचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. अ‍ॅलिस्टर कुक कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना दिसत आहे, तर आपला शंभरावा कसोटी सामना केव्हिन पीटरसन अविस्मरणीय करतो का, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. मधल्या फळीतील जोनाथन ट्रॉट आणि इयान बेल यांच्यावर इंग्लंडची फलंदाजी अवलंबून असेल. गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि ग्रॅमी स्वान हे इंग्लंडची प्रमुख अस्त्रे असतील.
ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार मायकेल क्लार्कचे पुनरागमन झाले असून ते संघासाठी किती फायदेशीर ठरते, हे सर्वासाठीच उत्सुकतेचे असेल. त्याचबरोबर अष्टपैलू शेन वॉटसन, जॉर्ज बेली, मिचेल जॉन्सन आणि पीटर सिडल यांच्यावरही साऱ्यांच्या नजरा असतील.
 प्रतिस्पर्धी संघ
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), ख्रिस रॉजर्स, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, स्टिव्हन स्मिथ, जॉर्ज बेली, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), मिचेल जॉन्सन, पीटर सिडल, रायन हॅरिस आणि नॅथन लिऑन.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मायकल कॅरबेरी, जोनाथन ट्रॉट, केव्हिन पीटरसन, इयान बेल, जो रूट, मॅट प्रायर (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, ग्रॅमी स्वान, ख्रिस ट्रेमलेट, जेम्स अँडरसन आणि जॉनी बेअरस्टोव्ह.