दमदार सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३८१ धावांनी पराभव केला. मात्र इंग्लंडचा संघ या मानहानीकारक पराभवातून पुनरागमन करेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने व्यक्त केले. आक्रमक डावपेचांसह अॅडलेड कसोटीत इंग्लंडचा संघ पुन्हा भरारी घेण्याची शक्यता लियॉनने वर्तवली आहे.
‘‘इंग्लंड एक अव्वल संघ आहे आणि ही अॅशेस मालिका आहे. त्यामुळे आम्हाला बेसावध राहून चालणार नाही. कसोटी क्रिकेट हा कौशल्याची परीक्षा पाहणारा प्रकार आहे. त्यामुळे विजयासाठी आम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. आम्ही नेहमीच आक्रमक स्वरूपाचे डावपेच अवलंबतो. ती ऑस्ट्रेलियाची शैली आहे. मात्र खेळभावनेला गालबोट लागेल अथवा मर्यादांचे उल्लंघन होईल, असे वर्तन घडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ,’’ असे त्याने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘अॅडलेडची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल, अशी आशा आहे. स्टीव्हन स्मिथ, मायकेल क्लार्क हेसुद्धा फिरकी गोलंदाज म्हणून योगदान देऊ शकतात. गोलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगिरी केल्यास, कामचलाऊ गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागणार नाही. संघाचा मुख्य फिरकीपटू म्हणून जबाबदारीचे मला भान आहे आणि मला ही भूमिकी आवडते. सर्वोत्तम कामगिरीसाठी मी प्रयत्नशील आहे.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 1:39 am