13 July 2020

News Flash

प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवत दिव्यांशची भरारी!

दिव्यांशने वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला.

|| ऋषिकेश बामणे

फलंदाजी करताना यष्टीरक्षकाकडे कमीतकमी चेंडू जात असतील, तर तो सर्वोत्तम फलंदाज, अशी व्याख्या वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी केली आहे. रिचर्ड्स यांच्या दृष्टिकोनाआधारेच प्रशिक्षक अशोक कामत यांनी मुंबईकर दिव्यांश सक्सेनातील कौशल्य हेरले. चेंबूर येथील अणूशक्ती नगरला राहणाऱ्या १८ वर्षीय दिव्यांशची २०२०च्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी भारताच्या संघात निवड करण्यात आल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार नाही.

डावखुऱ्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या दिव्यांशने फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कारकीर्दीतील पहिल्याच सामन्यात १२२ धावांची शतकी खेळी साकारून सर्वाचे लक्ष वेधले. परंतु सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याला वगळण्यात आले. मात्र यादरम्यानच इंग्लंडला झालेल्या तिरंगी मालिकेत त्याने सात सामन्यांत ४०० धावा केल्या.

दिव्यांशने वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. भाभा अणूसंशोधन केंद्रात संशोधक पदावर कार्यरत असणाऱ्या वडील अजयकुमार यांच्या पाठिंब्यामुळे अणूशक्ती नगरच्याच मैदानावर अशोक अस्वलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. मग मुंबईच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक कामत यांनी दिव्यांशचा खेळ पाहून त्याला दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीत बोलावून घेतले. सुरुवातीचा एक वर्ष माहूल येथे अमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे तंत्र विकसित केल्यावर कामत यांच्या प्रशिक्षणाखाली दिव्यांश चर्चगेटला सराव करण्यासाठी जाऊ लागला. दादर युनियन आणि वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रतिनिधित्व करताना दिव्यांशने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

पोदार महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या दिव्यांशला कारकीर्दीतील आव्हानात्मक काळाविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘‘२०१८च्या विनू मंकड करंडकात माझ्याकडून धावा न झाल्यामुळे मला काही सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले. परंतु कूचबिहार करंडकात माझी निवड झाल्यावर मी पहिल्याच लढतीत द्विशतक झळकावले. त्यावेळी संघाबाहेर असताना अनेकदा निराशेला सामोरे जावे लागायचे. कित्येकदा कामगिरी करूनही मुंबईच्या संघात स्थान मिळायचे नाही. परंतु प्रशिक्षक आणि कुटुंबियांच्या मार्गदर्शनामुळे मी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून खेळत राहिलो.’’

‘‘वयाच्या १२व्या वर्षांपासून मी दिव्यांशचा प्रवास पाहत असून त्याला मनगटी फटके खेळण्याची कला चांगलीच अवगत आहे. आता त्याच्या कारकीर्दीला सुरुवात झाली असून भविष्यात तो नक्कीच भारताच्या वरिष्ठ संघातही खेळेल,’’ असे कामत यांनी सांगितले.

निवडीच्या उत्सुकतेपोटी रात्र जागून काढली!

‘‘रविवारी सायंकाळीच मी अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळून लखनौवरून मुंबईत परतलो. युवा विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होणार असल्याची कल्पना असल्याने मला रात्रभर झोपच लागली नाही. माझे कुटुंबीयही माझ्यासह जागेच होते. सकाळी निवड झाल्याचे कळताच नातेवाईक, मित्रमंडळींचे दूरध्वनी येण्यास सुरुवात झाली. आई-वडिलांनीही शेजाऱ्यांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. माझ्या वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल टाकल्याने हा क्षण मी कधीच विसरणार नाही,’’ असे दिव्यांशने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 1:10 am

Web Title: the best coach of the wicket keeper akp 94
Next Stories
1 दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धा : भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत
2 आठ फेरे घेत बबिता फोगट अडकली विवाहबंधनात
3 Video : अ‍ॅस्टन अगारने हवेतच टिपला भन्नाट झेल
Just Now!
X