बॅडमिंटन हे शटल अर्थात फुलांचे विश्व. भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालसाठी हे वर्ष ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी..’ असेच ठरले. सततच्या दुखापती आणि जोडीला खराब फॉर्म यामुळे सायनाची जेतेपदांची पाटी कोरीच राहिली. मात्र भारतीय बॅडमिंटन म्हणजे केवळ सायना नाही, हे या वर्षांने सप्रमाण सिद्ध केले. पी. व्ही. सिंधूसह असंख्य युवा बॅडमिंटनपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले. मात्र प्राजक्ता सावंतला निव्वळ खेळण्यासाठी द्यावा लागलेला न्यायालयीन लढा, सांघिक निर्णयासाठी अनाकलनीय वाटाव्या अशा पद्धतीने ज्वाला गट्टाची केलेली आजीवन बंदीची शिफारस आणि इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये झालेली नियमांची परवड या सर्व गोष्टींनी बॅडमिंटनविश्वात सारे काही गुलाबाच्या फुलासारखे सुखद नाही, तर काटेरीसुद्धा आहे, हे स्पष्ट झाले.
सायनाची घसरण
प्रकृती अस्वास्थ्य प्रगतीला किती मारक ठरू शकते, याचा प्रत्यय सायनाच्या निमित्ताने आला आहे. विविध दुखापतींनी ग्रासलेली सायना वर्षांत एखादी तरी स्पर्धा संपूर्ण तंदुरुस्त स्थितीत खेळली का, असा प्रश्न पडावा इतकी तिची कामगिरी खालावली. ऑलिम्पिक यशानंतर सायनाच्या खेळाचा प्रतिस्पध्र्यानी कसून अभ्यास केला. प्रचंड वेगवान हालचालींसह वावर या मुद्दय़ावर तिला नामोहरम करता येते, हे प्रतिस्पध्र्यानी जाणले. यामुळेच प्राथमिक फेरीत अननुभवी खेळाडूही सायनाला हरवताना दिसत आहेत. ऑलिम्पिक पदकानंतर सायनाच्या कामगिरीत अस्थर्य दिसू लागले आहे. याचाच परिणाम होऊन जागतिक क्रमवारीत तिची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. सरत्या वर्षांतल्या चुका आणि कटू आठवणी मागे ठेवून तिने विजयपथावर परतायला हवे, हीच भारतीय क्रीडारसिकांची अपेक्षा आहे.
सिंधू संस्कृती
सायनाला समांतर एक जागतिक दर्जाची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या रूपाने भारताला मिळाली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावत सिंधूने यंदा इतिहास घडवला. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. याच वर्षी तिने मलेशिया आणि मकाऊ ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धाच्या जेतेपदावर कब्जा केला. या दिमाखदार कामगिरीची दखल घेत सिंधूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उंच आणि काटक शरीर, मॅरेथॉन लढती खेळण्याची तयारी, सर्व फटक्यांवर असलेले प्रभुत्व, चीनच्या खेळाडूंना टक्कर देण्यासाठी लागणारी मानसिक कणखरता या बळावरच सिंधूने हे यश प्राप्त केले आहे. वर्षांअखेरीस झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद नावावर करत सिंधूने आपल्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला आहे.
उद्याची आशा
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक बॅडमिंटनपटूंनी यंदाच्या वर्षांत मिळवलेले यश हे या खेळाचा व्यापक प्रसार आणि गुणवत्ता दर्शवते. आंध्र प्रदेशमधील गुंटूरमध्ये कारकिर्दीची सुरुवात करणारा कदम्बी श्रीकांत यंदाचा उगवता तारा ठरला. थायलंड ग्रां. प्रि. स्पर्धेच्या जेतेपदासह राष्ट्रीय जेतेपदही पटकावत श्रीकांतने आपले कर्तृत्व सिद्ध केले. मूळचा पश्चिम बंगालचा मात्र ठाण्यात बॅडमिंटनचे धडे गिरवणाऱ्या शुभंकर डेने केनियात झालेल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बहरिन येथे झालेल्या दोन स्पर्धामध्ये मुंबईकर तन्वी लाड आणि सायली राणे यांनी जेतेपद नावावर केले. न्यायालयीन लढाईचे शुक्लकाष्ठ मागे असतानाही प्राजक्ता सावंतने बहरिनमध्ये सनावे थॉमसच्या साथीने मिश्र दुहेरीत तर अराथा सारा सुनीलच्या बरोबरीने महिला दुहेरीच्या जेतेपदाची कमाई केली. प्राजक्ता-अराथा जोडीनेच ढाका येथे झालेल्या स्पर्धेतही जेतेपदावर निशाणा साधला. प्रज्ञा गद्रेने सिक्की रेड्डीच्या साथीने खेळताना बहरिनमध्ये आणि मुंबईत झालेल्या टाटा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. मुंबईकर चिराग शेट्टीने आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
आयबीएलचा प्रयोग
बहुचर्चित इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल) स्पर्धेचा नारळ अखेर २०१३मध्ये फुटला. सायनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबाद हॉटशॉट्सने जेतेपद पटकावले. बॅडमिंटनपटूंना मालामाल होण्याची संधी देणारी ही लीग अनेकविध वादांनी गाजली. खेळाडूंना कल्पना न देता पायाभूत रक्कम कमी करणे, बदली खेळाडूच्या नियमाबाबत गोंधळ, खेळाडूंना दमवणारे वेळापत्रक, तीन महिन्यांनंतरही परदेशी खेळाडूंचे मानधन थकवणे असे प्रकार समोर आले. आयबीलमध्ये दर्जेदार खेळ पाहायला मिळाला, भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा उपयुक्त आहे, मात्र या सगळ्याला व्यावसायिकतेची जोड देणे अत्यावश्यक आहे.
आकस आणि वाद
आयबीएलच्या एका सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघाने आयत्या वेळी संघात बदल केल्याने दिल्ली स्मॅशर्सची कर्णधार असलेल्या ज्वाला गट्टाने सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. या तिढय़ातून मार्ग निघून अखेर सामना झाला. हा निर्णय ज्वालाचा वैयक्तिक नव्हता, संघव्यवस्थापनाचा होता. मात्र ज्वालाला लक्ष्य करून तिच्यावर आजीवन बंदीची शिफारस करण्यात आली. उत्तेजके, सामना निश्चिती असा कुठलाही गंभीर आरोप नसताना केवळ आकसापोटी संघटनेने तिच्यावर बंदी घातली. ज्वालाने न्यायालयाचा मार्ग अवलंबला आहे. या लढाईत विजय कोणाचाही झाला तरी नुकसान खेळाचे होणार आहे.
जी गत ज्वालाची तीच मुंबईकर प्राजक्ता सावंतची. संघात समाविष्ट होण्यासाठी, राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यासाठी, अन्य भारतीय खेळाडूंप्रमाणे खर्च संघटनेने उचलावा यासाठी तिला न्यायालयीन लढाई लढावी लागते. संघटना खेळाडूंसाठी असते, हे केवळ कागदावर आहे. प्रत्यक्षात या दोन्ही घटनांमध्ये सामोपचाराने प्रश्नांची उकल करता आली असती, मात्र भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या घृणास्पद कारभारामुळे फुलांच्या खेळात काटय़ांचीच संख्या आता अधिक झाली आहे.