‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरीच्या वडिलांची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
‘महाराष्ट्र केसरी’ चा मान मिळविणाऱ्यांना यापुढे पोलीस सेवेत थेट सामावून घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ चा मान मिळविणाऱ्या विजय चौधरी यांचे वडील नथ्थू चौधरी त्याबाबत साशंक आहेत. मागील वर्षी देखील अशीच घोषणा झाली होती. परंतु, ती घोषणा हवेतच विरली. किमान आता तरी मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळविणाऱ्या कुस्तीपटू विजय चौधरीचे गाव. विजयच्या यशामुळे सध्या या गावात दिवाळीसारखे वातावरण असून रविवारी रात्री उशिरापर्यंत आतषबाजी सुरू होती. त्यातच या वर्षांपासून महाराष्ट्र केसरीचा मान मिळविणाऱ्यास पोलीस सेवेत थेट सामावून घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने ग्रामस्थांच्या आनंदात अधिकच भर पडली होती. परंतु, विजयचे वडील नथ्थू चौधरी मात्र अद्याप या
घोषणेवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.
मागील वर्षी जेव्हा विजयने पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळविला, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यास शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, वर्षभर मंत्रालयाच्या अनेक फेऱ्या मारूनही पदरी काहीच पडले नाही, अशी खंत विजयच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच दुसऱ्यांदा तरी मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनाची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.