आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा पहिला मान शुक्रवारी भारतीय संघाने प्राप्त केला. २००७च्या पहिल्यावहिल्या विश्वचषक स्पध्रेनंतर प्रथमच भारताने उपांत्य फेरी गाठण्यात यश मिळवले आहे. सुपर-टेनमधील दुसऱ्या गटातील एकतर्फी सामन्यात भारताने यजमान बांगलादेशवर आठ विकेट आणि ९ चेंडू राखून आरामात विजय मिळवला.
भारताने आधी बांगलादेशला ७ बाद १३८ धावांवर सीमित ठेवले. लेग-स्पिनर अमित मिश्राने सलग तिसऱ्या सामन्यात आपल्या जादुई फिरकीची कमाल दाखवत २६ धावांत ३ बळी घेतले, तर आर. अश्विनने १५ धावांत २ बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवले. भारताचे फिरकी गोलंदाज आणि आघाडीच्या फलंदाजांनी भारताच्या विजयाचा अध्याय लिहिला.
भारताने सलग तिसऱ्या विजयासह गुणतालिकेतील दुसऱ्या गटात ६ गुणांसह अव्वल स्थान संपादन केले आणि आपले उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आता भारताचा अखेरचा सामना ऑस्ट्रेलियासोबत आहे.
शिखर धवन (१) लवकर बाद झाल्यावर रोहित शर्मा (५६) आणि विराट कोहली (५७*) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी साकारून भारताला विजयासमीप पोहोचवले. शर्मा आणि कोहली या दोघांनीही आपले सलग दुसरे अर्धशतक नोंदवले. धोनीने १२ चेंडूंत नाबाद २२ धावा  केल्या. झियाऊर रेहमानला सुरेख षटकार ठोकून धोनीने भारताचा विजय आणि उपांत्य फेरी गाठल्याचा आनंद साजरा केला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १३८ (अनामुल हक ४४, मुशफिकर रहीम २४, महंमदुल्लाह नाबाद ३३; अमित मिश्रा ३/२६, रवीचंद्रन अश्विन २/१५) पराभूत वि. भारत : १८.३ षटकांत २ बाद १४१ (विराट कोहली नाबाद ५७, रोहित शर्मा ५६; मशरफी मुर्तझा १/२३)
सामनावीर : आर. अश्विन.