टेनिसविश्वातील महान खेळाडू रॉ़जर फेडरर येत्या 8 एप्रिलला 40 वर्षांचा होणार आहे. फेडररच्या वाढदिवशी स्वित्झर्लंड आपला राष्ट्रीय दिवस साजरा करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, हा एक विनोद असल्याचे समोर आले आहे. एप्रिल फूलच्या निमित्ताने स्वित्झर्लंडच्या खासदारांनी हा विनोद केल्याचे सांगितले आहे.

टेनिसमधील योगदानाप्रती भावना व्यक्त करण्यासाठी स्वित्झर्लंड 8 ऑगस्ट 2021ला आपला नवीन राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी करत असल्याची चर्चा होती. स्वित्झर्लंडच्या संसदेत अनेक खासदारांनी फेडररचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यासाठी सोशल मीडियावर पुढाकार घेतला. बघता बघता 80 लाख नागरिकांमध्ये ही चर्चा होऊ लागली. मात्र, हा मोठा विनोद असल्याचे समोर आले.

विनोद म्हणून स्विस टूरिझम फेडरेशनचे अध्यक्ष समुपदेशक निकोलो पगनिनी यांनी संसदेच्या इतर सदस्यांसह असाधारण संसदीय अधिवेशनात फेडररच्या वाढदिवशी राष्ट्रीय दिवस बदलण्याची घोषणा केली. 1 ऑगस्टला स्वित्झर्लंड आपला राष्ट्रीय दिवस साजरा करतो.

या विनोदाची फेडररला कल्पना होती. फेडरर म्हणाला, “या कल्पनेने मला आनंद झाला, पण राष्ट्रीय दिवसाची छेडछाड होणार नाही याबद्दलही मी खूष आहे. स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असल्याचा मला अभिमान आहे.” भारतातही स्वित्झर्लंडच्या या मोहिमेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला.

फेडररच्या वाढदिवशी राष्ट्रीय दिवस बदलणे हा एक विनोदच ठरला, परंतु गेल्या वर्षी फेडररच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडने 20 फ्रँक चांदीची नाणी समोर आणली होती.