सोशल मीडियावर सध्या #10YearsChallenge ने धुमाकूळ घातलाय. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर युजर्स आपले 10 वर्षांपूर्वीचे फोटो पोस्ट करतायेत आणि त्यासोबत तो फोटो काढतानाच्या आठवणींनाही उजाळा देत आहेत. म्हणजे बघायला गेलं तर युजर्स 10 वर्षांमध्ये त्यांच्यासमोर आलेली आव्हानं आणि अनुभव सांगत आहेत. व्यक्ती त्याच्या वयापेक्षा या 10 वर्षामधील अनुभवामुळे किती समजदार झालाय हे सांगण्याचा युजर्सचा याद्वारे प्रयत्न आहे. भारतीय क्रिकेटमध्येही गेल्या दशकभरात अमुलाग्र बदल पहायला मिळाले आहेत. कितीतरी अविस्मरणीय आणि भावूक क्षण आपण पाहिले. 2009-2019 या कालावधीत भारतीय क्रिकेट आणि खेळाडूंमध्ये काय बदल झाले. तर चला मग आपणही भारतीय क्रिकेटच्या अध्यायावर एक नजर मारूयात.

यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचा उदय –

भारतीय टीममध्ये सौरव गांगुली आणि अनिल कुंबळेसारख्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनेक बदल होण्यास सुरुवात झाली होती. दोन दिग्गज कर्णधारांच्या निवृत्तीनंतर धोनी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला. कर्णधार म्हणून धोनीने ज्या गोष्टीला स्पर्श केला जणू काही सोन्यातच तिचं रूपांतर झालं. कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून धोनीने आपल्या पहिल्या 12 कसोटी मालिकांमध्ये एकदाही पराभवाची चव चाखली नव्हती, त्या 12 पैकी 9 मालिकांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला तर 3 मालिका अनिर्णित राहिल्या. कर्णधार म्हणून सुरुवातीच्या 3 वर्षांमध्ये धोनी सर्वोत्तम होता. परिणामी तब्ब्ल 28 वर्षानंतर भारत वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी ठरला. कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही धोनीने यावर्षी आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते.

( आणखी वाचा : असा घडला विराट कोहली )

2011 वर्ल्डकपमध्ये भारताचा विजय –

विश्वचषक विजय गेल्या दहा वर्षातील भारतीय संघाचे सर्वात मोठं यश होय. साखळी सामन्यांमध्ये केवळ आफ्रिकेविरुद्धचा एकमेव पराभव वगळता संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहिला.28 वर्षानंतर मिळालेल्या वर्ल्डकप विजयाने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं. जगतजेतेपदानंतर भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं. यासह भारताने आयसीसीच्या सर्वच स्पर्धाचे जेतेपद मिळवलं.

ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी विजय –
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 70 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला.

‘रण’मशीन विराट कोहली –

गेल्या 10 वर्षांमधील शानदार कामगिरीच्या बळावर कोहलीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातील जवळपास सगळ्या विक्रमांना गवसणी घातली. कोहली एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 10 हजार धाव करणारा खेळाडू बनला. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहली जगातला नंबर एकचा फलंदाज आहे. विराट लवकरच १९,००० हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण करेल. ५६.५९ च्या सरासरीने धावा काढणारा सध्याच्या घडीला विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. विराटच्या नावावर सध्या ६४ शतके आहेत. एकदिवसीय सामन्यात ३९ शतके केली आहेत.

(आणखी वाचा : आकडेवारीच म्हणतेय… ‘टायगर’ धोनी जिंदा है ! )

आयसीसी क्रमवारीत दबदबा –
आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ आणि खेळाडूंनी दबदबा निर्माण केला. कसोटीमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानवर आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, बुमराह, अश्विन, जाडेजा यांनी आयसीसी क्रमवारीवर छाप सोडली आहे.

आयपीएलची भूमिका –
दशकभरापूर्वी सुरू झालेल्या आयपीएलने युवा खेळाडूंची फौजच तयार केली. युवा खेळाडूंना प्रतिभा आणि राष्ट्रीय संघातील निवडीसाठी स्वतःच्या कामगिरीचा ठसा उमटवण्याचा मोठा प्लॅटफॉर्म बनलाय. प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आणि वरिष्ठ खेळाडूंची जागा भरण्यामध्ये आयपीएलने खूप मोठी भूमिका निभावलीये. आयपीएलने राष्ट्रीय संघाच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणली आणि प्रतिभावान खेळाडूंना स्वतःसाठी संघात जागा बनवण्याचे दरवाजे उघडे करून दिले. आता तर आयपीएलच्या पावलावर पाऊल ठेवत कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या राज्य संघानी स्थानिक लीगची सुरुवात केलीये, याचाही मोठ्या प्रमाणात फायदा भारतीय संघाला होतोय आणि येत्या काळात ते प्रकर्षाने दिसून येईन.

परदेशातील कसोटी विजयामध्ये वाढ –
2009 नंतर भारताने परदेशात एकूण 18 कसोटी जिंकल्यात. यातील 2 ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश, 1 न्युझीलंड, 3 वेस्टइंडीज आणि 6 श्रीलंकेत आहेत. आधीच्या तुलनेत परदेशातील पराभवाचा आकडा बराच कमी झालाय. ही भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय बाब आहे.

जलदगती गोलंदाजांची फौज-
गेल्या 10 वर्षांमधील बदलाचा विचार केल्यास सर्वात मोठा बदल भारतीय संघाच्या जलदगती गोलंदाजीत प्रकर्षाने दिसून येतो. कधी नव्हे अशी जलदगती गोलंदाजांची फौज संघात बघायला मिळतेय. सध्या संघात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज अशी भली मोठी जलदगती गोलंदाजांची फौज दिसते. गतवर्षी एकूण 150 विकेट घेऊन या गोलंदाजांनी 34 वर्ष जुना विक्रमही तोडला. यामध्ये इशांत, बुमराह, शमी यांचा मोठा वाट राहिला. आपल्या गोलंदाजांनी केवळ विकेटच घेतल्या असं नाही तर विरोधी संघातील फलंदाजांच्या मनात आपल्या वेगामुळे आणि अचूक टप्प्यावर मारा करण्यामुळे दहशत निर्माण केलीये.

फिटनेस आणि क्षेत्ररणात बदल-
टी-20 सारख्या झटपट क्रिकेटमुळे खेळाडूंच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली. प्रत्येक खेळाडूला आपल्या फिटनेसबाबत विशेष काळजी घेणं अत्यावश्यक झालं. कमजोर क्षेत्ररक्षकाला संघात जागा मिळवणं आता जवळपास अशक्य आहे. दररोज नवनव्या प्रकारे क्षेत्ररक्षकाला प्रशिक्षण घ्यावं लागतंय, यो-यो टेस्ट त्याचाच एक भाग आहे.

निडर आणि आक्रमक फलंदाजांचा उदय –
आयपीएलने ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल अशा युवा फलंदाजांमध्ये निडर आणि आक्रमक होण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. गोलंदाजांचा वेग किंवा तो किती महान गोलंदाज आहे याचा अजिबात विचार न करता हे फलंदाज सुरुवातीपासूनच आक्रमक फटके खेळतात.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फिरकीपटूचा दबदबा-
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटू जोडगोळीने विरोधी संघाच्या नाकी नऊ आणलेत. या दोघांच्या अप्रतिम केमिस्ट्रीमुळे मधल्या षटकांमध्ये अनेकदा प्रतिस्पर्धी फलंदाजांचीअक्षरशः भंबेरी उडालेली पाहायला मिळते. गेल्या दोन वर्षांमध्ये शानदार कामगिरी करत दोघांनीही भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान दिलं आहे.

तिन्ही प्रकारासाठी वेगवेगळे खेळाडू –
2009 च्या तुलनेत आताचा भारतीय संघ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नाही. तिन्ही प्रकारासाठी तज्ञ आणि अनुभवी खेळाडूंची फौचच संघाकडे उपलब्ध आहेत.

भारतीय कसोटी संघात वेगळी भूमिका असलेल्या खेळाडूंची वर्णी –
2009 मध्ये भारतीय कसोटी संघात केवळ तज्ञ खेळाडूंचा समावेश होता. पण काळानुसार वेगवेगळी भूमिका असलेल्या खेळाडूंना संघात जागा मिळायला सुरुवात झाली आहे. हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंनी कसोटी संघात जागा मिळवलीये. पूर्वी असे खेळाडू केवळ मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीच उपयुक्त मानले जायचे. तसंच, परदेशात खेळताना अनेकदा संघात समतोल ठेवण्यासाठी जडेजा किंवा अश्विनपैकी एकाला अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडावी लागते.

दर्जेदार राखीव खेळाडूंची फौज –
2009 च्या दरम्यान काही वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीवर संघाची मदार असायची आणि त्यांच्याशिवाय संघ अर्धवट वाटायचा. पण सध्या प्रमुख खेळांडूंशिवाय अनेक दर्जेदार खेळाडूंची फौज संघाकडे आहे.

कसोटी विजयाची सवय –
आधीच्या तुलनेत आता भारतीय संघाचे कसोटी सामने कमी प्रमाणात अनिर्णीत राहतात आणि सामन्याचा निकाल येण्याची संख्या वाढली आहे. आता कसोटी खेळतानाही खेळाडू आक्रमक शैलीत खेळताना दिसतात. परिणामी कसोटी क्रिकेटमधील रोमांच अजून वाढला आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये बदल –
आधीच्या तुलनेत भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. स्थानिक क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या रणजी चषकात यावर्षीपासून 9 नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक स्पर्धांसह आयपीएलने खेळाडूंना त्यांचा खेळ उंचावण्यात आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनण्यामध्ये मोठी भूमिका निभावली आहे. काही महिने रणजी चषक आणि नंतर सातत्याने आयपीएल खेळल्याने भारतात जागतिक दर्जाच्या खेळाडूंची फौज तयार झाली आहे. 19 वर्षांखालील पृथ्वी शॉ, शुभमन गिल अशा खेळाडूंची रांग वाढतंच आहे.

सोशल मीडियाची भूमिका –
वर्तमान काळात सोशल मीडियामुळे खेळाडू आणि चाहते यांच्यातील अंतर बरंच कमी झालं आहे. चाहत्यांची मागणी, विनंती अथवा सल्ला आता थेट खेळाडूंपर्यंत पोहोचतोय.

भारतरत्न – सचिन तेंडुलकर
गेल्या 10 वर्षांमध्ये वर्ल्डकपशिवाय भारतीय क्रिकेटसाठी सर्वात अभिमानाची गोष्ट ठरली ती म्हणजे सचिन तेंडुलकरला मिळालेला भारतरत्न पुरस्कार. सचिन तेंडुलकर भारताचा पहिला खेळाडू ठरला ज्याला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान केवळ व्यक्तिविशेष म्हणून नाही तर सगळ्या देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी खूप मोठा सन्मान आहे. भारतीय क्रिकेटसाठी हा अजून मोठा सन्मान आहे कारण हा सन्मान मिळवणारा भारताचा पहिला खेळाडू एक क्रिकेटपटू ठरलाय.

गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या बदलाचा घेतलेला हा धावता आढावा. यावरुन तूम्ही अंदाज लावू शकता की, दशकभरात भारतीय क्रिकेटने खूप काही कमावलं आणि जबरदस्त यश मिळवलं आहे.