भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज

धरमशाला : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतील सपशेल अपयशाला मागे सारून धरमशाला येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेद्वारे नवी सुरुवात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेषत: तब्बल आठ महिन्यांनी भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवणाऱ्या प्रतिभावान अष्टपैलू हार्दिक पंडय़ाच्या पुनरागमनाकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला फेब्रुवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत अनुक्रमे ०-३ आणि ०-२ असा सपाटून मार खावा लागला; परंतु अनेक अनुभवी खेळाडू दुखापतीतून सावरत परतल्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेद्वारे नव्याने संघबांधणी करण्याची भारताला संधी आहे.

२६ वर्षीय हार्दिक गतवर्षी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला आहे. सप्टेंबरमध्ये आफ्रिकेविरुद्धच्याच ट्वेन्टी-२० मालिकेसाठी हार्दिकने पुनरागमन केले होते; परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पाठीच्या दुखापतीने ग्रासल्यामुळे हार्दिकला संघातील स्थान गमवावे लागले. हार्दिकच्या अनुपस्थितीत शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावण्यात अपयशी ठरले.

धवन, भुवनेश्वरही सज्ज

सलामीवीर शिखर धवन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसुद्धा भारतीय संघातील स्थान पक्के करण्यासाठी आतुर आहेत. धवनला खांद्याच्या दुखापतीमुळे तर भुवनेश्वरला शस्त्रक्रियेमुळे बराच काळ संघापासून दूर राहावे लागले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार कोहली, के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. जसप्रीत बुमरा भारताच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. पृथ्वी शॉ-शुभमन गिल यांच्यात संघातील स्थानासाठी चढाओढ पाहण्यास मिळेल.

आफ्रिकेची मदार डी कॉक, डय़ू प्लेसिस यांच्यावर

वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाच्या अनुपस्थितीत कर्णधार क्विंटन डी कॉक आणि माजी कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस या दोघांवर आफ्रिकेच्या संघाची प्रामुख्याने भिस्त असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करणारा हेन्रिच क्लासेन आणि युवा जानेमन मालन यांच्यावरही आफ्रिकेचे यश अवलंबून आहे. लुंगी एन्गिडी आणि फिरकीपटू केशव महाराज या गोलंदाजांवर आफ्रिकेची धुरा आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, के. एल. राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, शुभमन गिल.

दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (कर्णधार), तेम्बा बव्हुमा, ऱ्हासी व्हॅन डर दुसेन, फॅफ डय़ू प्लेसिस, कायले व्हेरेन, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन स्मट्स, अँडिले फेहलुकवायो, लुंगी एन्गिडी, लुथो सिपामला, ब्युरन हेंड्रिक्स, आनरिख नॉर्किया, केशव महाराज, जॉर्ज लिंडे, जानेमन मालन

भारतीय संघात पुनरागमन केल्याचा मला आनंद आहे. स्वत:च्या तंदुरुस्तीवर मी गेल्या काही महिन्यात अफाट मेहनत घेतली आहे. आगामी ‘आयपीएल’ आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी स्वत:चे अष्टपैलूत्त्व सिद्ध करण्यासाठी मी सज्ज आहे.           

-हार्दिक पंडय़ा.

८४ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ८४ एकदिवसीय सामने झाले असून आफ्रिकेने ४६, तर भारताने ३५ सामने जिंकले आहेत. तीन लढती रद्द करण्यात आल्या आहेत.

३१ भुवनेश्वर-बुमरा या दोघांनी एकत्र खेळलेल्या ४१ लढतींपैकी भारताने तब्बल ३१ सामने जिंकले आहेत, तर १० सामने गमावले आहेत.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून

*थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि हिंदी १

‘करोना’ आणि पावसाचा तिकिटविक्रीला फटका

संपूर्ण भारतात थैमान घातलेला ‘करोना’ विषाणू संसर्ग आणि हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे धरमशाला येथील पहिल्या लढतीच्या तिकिटविक्रीला फटका पडला आहे.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एचपीसीए) स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २२ हजार इतकी असून मंगळवारी रात्रीपर्यंत फक्त १६ हजार तिकिटांचीच विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे विदेशातून येणाऱ्या चाहत्यांच्या संख्येतही घट झाली असल्याचे संघटनेच्या अधिकाऱ्याने सांगितले. आफ्रिकेच्या एकाही पत्रकाराने या मालिकेसाठी अर्ज भरला नसून ‘करोना’च्या संसर्गापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठीच भारतीय तसेच विदेशी चाहते गर्दीच्या ठिकाणी जमा होण्यास टाळत असावेत, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. धरमशाला येथील हवामानाचा अंदाज वर्तवणे कठीण असून मंगळवारपासून येथे वेगाने वारे वाहण्याबरोबरच पाऊसही पडत असल्याने सामन्यावर या गोष्टीचाही प्रभाव पडण्याची शक्यता आहे.