फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून प्रारंभ

पॅरिस : फ्रेंच खुली ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा यंदा करोनाच्या साथीमुळे मे महिन्याऐवजी सप्टेंबरमध्ये खेळण्यात येणार आहे. मात्र महिना बदलल्याने थंड वातावरण आणि मोजके एक हजार प्रेक्षक हे नवीन चित्र रविवारपासून सुरू होणाऱ्या या लाल मातीवरील स्पर्धेत अनुभवायला मिळणार आहे.

ऐतिहासिक १२ वेळा फ्रेंच स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला १३व्या विजेतेपदासह एकूण २० ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. करोना संसर्गाच्या भीतीमुळे अमेरिकन खुल्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर नदालला पुनरागमन झोकात करता आलेले नाही. नुकत्याच झालेल्या क्ले कोर्टवरील इटालियन खुल्या स्पर्धेत नदालला विजेतेपदापासून दूर राहावे लागले. याउलट अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने इटलीमध्ये विजेतेपद पटकावत तो सज्ज असल्याचे दाखवले. या दोघांना गेल्या दोन फ्रेंच स्पर्धामध्ये उपविजेतेपद मिळवणारा ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम कसे आव्हान देतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महिलांमध्ये रोमानियाच्या सिमोना हॅलेपकडून अपेक्षा आहेत. हॅलेपने नुकतीच लाल मातीवरील इटली स्पर्धा जिंकत लयीत असल्याचे दाखवले आहे. २०१८मध्ये हॅलेपने फ्रेंच खुली स्पर्धा जिंकली होती. त्यातच गतविजेती ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी आणि अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणारी जपानची नाओमी ओसाका या दोघी नसल्याने हॅलेपला संधी आहे. तिच्यापुढे अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका या दोन अनुभवी खेळाडूंचे आव्हान असेल. सेरेना विक्रमी २४व्या ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. याउलट अझारेंकाने अमेरिकन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून ती लयीत असल्याचे दाखवले आहे.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, स्टार स्पोर्ट्स ३

* वेळ : दुपारी २.३० वाजल्यापासून