लेफ्टनंट कमांडर अभिलाष टॉमी यांनी शिडाच्या बोटीतून, एकटय़ाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. १ नोव्हेंबर २०१२ ते ६ एप्रिल २०१३ या काळात, कोठेही न थांबता समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले. अशीच सागर परिक्रमा कमांडर दिलीप दोंदे यांनी २००९ मध्ये चार थांबे घेऊन पूर्ण केली होती. या दोन साहसवीरांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन आपली ‘साहसगाथा’ उलगडली, त्याचा वृत्तान्त..
मी केवळ कल्पनेनेच मोहरलो होतो- अभिलाष टॉमी
आकाशातून भ्रमंती करता करता पाण्याचे आकर्षण कसे निर्माण झाले, कळले नाही. पण कमांडर दोंदे यांनी सागर परिक्रमा केली, त्या वेळी त्यांचा मदतनीस म्हणून मी जमिनीवरून काम पाहिले होते. आकाशमार्गे मीदेखील पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली आहे. त्यामुळे न थांबता सागर परिक्रमा करण्याची कल्पना समोर आली, त्या वेळी अ‍ॅडमिरल आवटी यांना माझेच नाव सुचवले.. मी केवळ कल्पनेनेच मोहरलो होतो. कमांडर दोंदे यांनी समुद्र परिक्रमा केलेली बोट घेऊन जायचे नक्की झाल्यावर बोटीत काही सुधारणा करणे आवश्यक होते. कमांडर दोंदे यांचा अनुभव खूप उपयोगी आला. माझी बोट जास्तीत जास्त ऊर्जा देऊ शकेल, यासाठी त्यावर सोलार पॅनल्स आणि विंड जनरेटर्स बसवली. समुद्रात जाण्याआधीपासूनच त्या बोटीशी दोस्तीचं नातं जडलं, त्यामुळे समुद्रात अजिबात एकटेपणा वाटला नाही..
दृष्टी भ्रमाचा धोका..
एकटय़ाने सागर परिक्रमा करताना झोपेची समस्या खूपच मोठी असते. पण त्याहीपेक्षा जास्त धोका असतो तो दृष्टी भ्रम होण्याचा. ४८ तासांच्या जागरणानंतर अवस्था खूप वाईट होते. दृष्टीभ्रम होतो आणि तो खूप वाईट असतो. दृष्टी भ्रमाच्या अनेक कथा मला माहिती आहेत.. एका व्यक्तीला तर असा भ्रम झाला की, संपूर्ण क्रू त्याच्या बोटीवर येऊन त्याला काम करायला मदत करत आहे. प्रत्यक्षात त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. एक व्यक्ती सात दिवस बोट वल्हवत होती. सात दिवसांनंतर आपली बोट एका बंदरात शिरत आहे, आजूबाजूला अनेक बोटी आहेत, लोक आपल्या नावाचा जयजयकार करताहेत, असे त्याला दिसले. त्याने एका
‘सुरक्षित’ जागी बोट थांबवली आणि नांगर टाकून तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर
त्याच्या लक्षात आले की, तो समुद्राच्या मध्यावर एकटाच होता. माझ्या बाबतीत नशिबाने दृष्टी भ्रम वगैरे काही झाला नाही. पण मला खूप लख्ख स्वप्ने पडायची. त्या स्वप्नातल्या गवताच्या पात्याचा आणि फुलाच्या पाकळ्यांचा रंगही स्पष्ट दिसायचा. हे फक्त अतिशय थकव्यामुळे होते.

मी त्या वादळाला सामोरा गेलो
केप ऑफ गुड होपला वळसा घालताना वाऱ्याचा वेग ७० नॉट एवढा होता. वारे जोराने वाहत होते. त्या वेळी १० मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा अंदाज होता, पण दहा मीटर लाटांचा अंदाज बांधतात, तेव्हा त्यांची उंची २० मीटपर्यंत जाऊ शकते. अशा वेळी समुद्र रौद्रच असतो. वेगवान वारे उसळत्या लाटा कापून काढत असतात. हे प्रत्यक्षात अनुभवण्याचा थरार काही वेगळाच होता. पण हा प्रवास करताना माझा प्रत्येक दिवस मी आखलेला होता. म्हणजे, पाच दिवसांनी वादळ येणार आहे, अशी सूचना मिळाली की त्यासाठी प्रत्येक दिवशी तयारी करून मी त्या वादळाला सामोरा गेलो आहे.
सागर परिक्रमेसाठी जाताना मला माझ्या आईची खूप मनधरणी करावी लागली. मी एकटय़ाने सागर परिक्रमेला जावे, यासाठी ती तयारच नव्हती. गेल्या वर्षी आम्ही मलेशिया आणि थायलंडला गेलो. त्या वेळी आम्ही कोचिनला थांबलो होतो. तेथील प्रत्येक वर्तमानपत्राने आमची दखल घेत आम्हाला भरपूर प्रसिद्धी दिली. तेव्हा तिला बरे वाटले. पण तरीही त्याही वेळी तिने मला बजावले की, हे शेवटचे! तिला एकच चिंता होती की, मी खूप वेळ तिच्याशी बोलणार नाही. तिच्याबरोबर असणार नाही. पण मी तिला समजावले की, तसाही मी सहा सहा महिने कामावरच असतो. या वेळीही तू तसेच समज. मग तिला थोडा आधार मिळाला. मला अडवणारी ही आईच मी परत आल्यानंतर मला सांगत होती की, ‘मला माहीत होते, की तू हे करू शकशील.’

‘फेसबुक’चा वैताग आला होता!
या संपूर्ण प्रवासात मला फेसबूकचा खूपच वैताग आला होता. मी जिथे असायचो तिथे रात्रीचे नऊ वाजलेले असायचे आणि भारतात सकाळचे आठ! लोक मला विचारायचे, ‘मग, नाश्ता काय केलास?’ बाकी सगळे प्रश्न सोडा. पण पहिला प्रश्न मात्र नेहमीच विचारला जायचा, ‘आत्ता कुठे आहेस?’ मी दिवसात शंभरदा तरी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मग मी पण खूप खवचटपणा करून ‘बोटीवर’ असे उत्तर द्यायचो. पण या चिवट माणसांची कथाच निराळी! लगेच प्रश्न यायचा, ‘बोट कुठेय?’ शेवटी शेवटी मी स्वत:ला इनव्हिजिबल ठेवायला लागलो. पण त्याचाही काही फायदा झाला नाही.

दुर्दैवाने ‘त्याचे’ लग्न झाले होते..
मी मॉरिशसच्या जवळ होतो. त्या वेळी एक चिनी जहाज माझ्याजवळून जात होते. त्यांनी माझ्याशी संदेश यंत्रणेवरून बोलायला सुरुवात केली. मी उत्तरेकडे जात आहे, असे बघून त्यांनी मला विचारले की, कुठे जात आहेस? त्यावर मी त्यांना म्हटले की, मुंबईला जातोय. त्यांना थोडेसे आश्चर्य वाटले आणि त्यांनी मला विचारले, ‘कुठून निघालास?’ मी त्यांना उत्तर दिले, ‘मुंबई’. त्याला काही कळलेच नाही. त्यांनी किमान दहा वेळा मला विचारले, ‘कुठे जातोस, आणि कुठून निघालास’. मी प्रत्येक वेळी फक्त ‘मुंबई’ हेच उत्तर देत होतो. शेवटी मी त्यांना सांगितले की, मी सागर परिक्रमा करत आहे.. मग आम्ही थोडय़ा गप्पा मारल्या. त्याने भारतीय नौदल आणि भारताचे थोडे कौतुक केल्यावर मला विचारले, ‘तुझे वय काय?’ मी सांगितले, ‘१९७९चा जन्म आहे माझा!’  त्यावर तो म्हणाला की, मीसुद्धा त्याच वर्षी जन्मलो. मलाही तुझ्यासारखी सागर परिक्रमा करायला नक्कीच आवडले असते, पण दुर्दैवाने माझे लग्न झाले आहे..’

ं‘नॉनस्टॉप’ परिक्रमेआधी.. कमांडर दिलीप दोंदे
‘माझ्या ‘म्हादेई’ परिक्रमेच्या वेळी अभिलाष हा माझ्या सपोर्ट टीमचा एक सदस्य होता. मी ज्या बंदरावर थांबायचो तेथे तो यायचा. बोटीत आवश्यक दुरुस्ती करायचा, उपकरणांची तपासणी करून पुढच्या टप्प्यासाठी बोट तयार करायचा आणि भारतात परतायचा. काही दिवसांनी पुढच्या बंदरावर यायचा. केपटाऊनला माझ्या परिक्रमेचा शेवटचा थांबा होता. इथे आल्यावर त्यानं विचारलं, ‘‘सर, आता पुढे काय?’’ आवटी म्हणाले, ‘‘आता नवे चॅलेंज. आपल्याजवळ आता सागर परिक्रमेचा अनुभव आहेच आणि बोटही आहे. त्यामुळं आता नवं आव्हान शोधलं पाहिजे.’ ..आणि इथे नॉनस्टॉप सोलो करण्याचा विचार केला. अभिलाषने हे करणे साहजिकच होते. त्याची ती पहिल्यापासूनची इच्छा होती आणि त्याला बोटीची माहितीही होती. २०११ मध्ये अभिलाषने केपटाऊन ते गोवा असा सोलो प्रवास केला. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. नौदलासमोर जेव्हा आम्ही या परिक्रमेचा प्रस्ताव मांडला, त्या वेळी सुरुवातीला नकार मिळाला. मी, रत्नाकर आणि अभिलाष त्यामुळे निराश झालो. पुन्हा प्रयत्न केले. जून २०१२मध्ये परवानगी मिळाली, आणि १ नोव्हेंबरला अभिलाषच्या नॉनस्टॉप सागर परिक्रमेला सुरुवात झाली.’

साहसाचा आनंद आगळाच..
‘साहस का करायचं? याचं काही एक उत्तर किंवा व्याख्या नाही. काहीतरी वेगळं करायचं म्हणून अनेक वेळा साहसी मोहिमा केल्या जातात. त्यातून अनेक गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळतात. आनंद आणि समाधान मिळतं. म्हणून कदाचित अशा मोहिमा होत असतील. २००९ साली मी जेव्हा सागर परिक्रमा करायचं ठरवलं तेव्हाही माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं करायचा विचार होता. मला कोणताही साक्षात्कार झाला नव्हता. मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मी ते केलं.

आम्ही तिघे, आणि बोटीची सोबत..
खरं म्हणजे, अशा सागर परिक्रमेत तुम्ही एकटे नसताच. तुमच्यासोबत तुमची बोट असते. तीच तुमची सखी, सहेली असते. मी माझ्या बोटीशी इतका एकरूप झालो होतो की तिच्याशी गप्पा मारायचो. तुमचं एक वेगळं जग असतं. त्या जगात तुम्ही वावरत असता. बाहेर दिवस उजाडतो, मावळतो. तुम्ही सर्व अनुभवत असता. मी जेव्हा २०१० साली माझी परिक्रमा पूर्ण करून परतलो त्या वेळी काही जणांनी मला विचारलं, ‘सोलो एकटय़ानेच केलं?’ वैतागून मी त्यांना म्हणालो, ‘‘नाही, आम्ही तिघे होतो.’ त्यावर ते म्हणाले, ‘तरीच! एवढा मोठा प्रवास एकटय़ाने शक्य आहे काय? आता त्या तिघांची नावंही सांगा.’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘आम्ही तिघे होतो. आय, मी आणि मायसेल्फ..’