अशक्य असे काहीच नसते, हे आपण बऱ्याचदा ऐकतो, पण नुकतीच याची प्रचिती आपल्याला आणून दिली ती अ‍ॅलिस्टर कुकच्या इंग्लिश सेनेने. भारतामध्ये भारताविरुद्ध खेळायचे या विचारानेच यापूर्वी भल्याभल्यांची झोप उडायची. पण या वेळी त्यांनी भारतीय संघाचीच झोप उडवली. असे यापूर्वी भारतात जास्त वेळा पाहायला मिळाले नाही. तेही इंग्लंडच्या संघाकडून नाहीच नाही. हा विजय मिळवायला भारताला २८ वर्षे वाट पाहायला मिळाली, यावरून भारताची आपल्या देशातली मक्तेदारी सिद्ध होत होती. कारण वातावरण, खेळपट्टय़ा आणि मानसिकता या गोष्टींचा मोठा प्रभाव यासाठी कारणीभूत होता. पण भारताच्या तुलनेत अननुभवी इंग्लंडचा संघ या वेळी आला तो पूर्ण तयारीनिशी आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले.
भारतीय दौऱ्यावर येण्यापूर्वी इंग्लंडने दुबईमध्ये सराव केला. या वेळी प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर, गोलंदाजी प्रशिक्षक मुश्ताक अहमद आणि फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅहम गूच यांच्या मार्गदर्शनाचा संघाला चांगलाच फायदा झाला. तर दुसरीकडे कर्णधार कुकने केव्हिन पीटसरन या बंडखोर वाटणाऱ्या खेळाडूला त्याने संघात स्थान दिले ते अनुभवाच्या जोरावर आणि केव्हिननेही आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला.
पहिला कसोटी सामना इंग्लंडने गमावला खरा, पण त्यामधून त्यांनी बरेच काही शिकले आणि त्या चुका सुधारून त्याची अंमलबजावणीही केली. पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कुकने प्रायरसह मोठी भागीदारी रचून काही संकेत दिले होते खरे, पण भारतीय संघ विजयाच्या नशेत मश्गूल राहिला. पहिल्या सामन्यात मॉन्टी पनेसारला न घेण्याची चूक त्याने वानखेडेच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात दुरुस्त केली आणि त्याचे त्याला फळ मिळाले. पनेसारने ११ बळी मिळवत भारतीय फलंदाजांना ‘पळता भुई थोडी’ करून सोडलं. त्याचबरोबर या सामन्यात कुक आणि पीटरसन यांची भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. दुसरा सामना जिंकल्यावर इंग्लंडचे मनोबल कमालीचे उंचावलेले होते. कोलकात्याच्या तिसऱ्या सामन्यात तर कुक हा बाद होऊच शकत नाही, असेच चित्र होते. दुर्दैवीरीत्या तो धावबाद झाला, पण त्याच्या १९० धावांच्या खेळीने संघाला विजयाची हमी मिळवून दिली. चौथ्या सामन्यात जामठाची संथ खेळपट्टी पाहून इंग्लंडने सामना अनिर्णीत राखण्याचा यशस्वी प्रयत्न करीत मालिका विजयाचा झेंडा फडकवला.
मालिकेच्या सुरुवातीला भारताचा संघ इंग्लंडपेक्षा सरस नक्कीच होता, पण भारताचा संघ कागदावरच सरस राहिला आणि इंग्लंडचा मैदानावर. इंग्लंड आणि भारत यांच्यातील तुलना केल्यास कुक आणि त्याला मिळालेली अन्य फलंदाजांची साथ व भेदक गोलंदाजी हा फरक प्रामुख्याने जाणवला. जिथे भारताचे फलंदाज धारातीर्थी पडत होते, तिथे इंग्लंडचे फलंदाज धावांची रास उभारत होते. जिथे भारतीय फिरकीपटू अपयशी ठरत होते, त्याच खेळपट्टीवर पनेसार आणि स्वान भारतीय फंलदाजांना नाचवत होते. फिरकीला पोषक खेळपट्टीवर जेम्स अ‍ॅन्डरसनची अफलातून गोलंदाजी हा त्यांच्यासाठी बोनस ठरला.
कुकचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण गेल्या २८ वर्षांत इंग्लंडला भारतात मालिका विजय मिळालेला नाही, हे दडपण त्याच्यावर नक्कीच होते. पण ते दडपण त्याने आव्हान समजले. याबाबत कोणतीही टुकार बडबड त्याने केली नाही आणि फलंदाजीच्या जोरावरच त्याने भारतीयांचे दात घशात घातले. मालिकेत ८०.२८ च्या सरासरीने त्याने ५६२ धावा फटकावल्या. एकीकडे फलंदाजीचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलवताना त्याने संघाचे कर्णधारपदही यशस्वीरीत्या भूषवले.
इंग्लंडने मिळवलेले हे यश नक्कीच ‘फ्लूक’ म्हणता येणार नाही. कारण अथक मेहनत, अभ्यास, उत्तम संघ बांधणी, संघ भावना आणि समन्वय यांचा सुंदर मिलाप इंग्लंडकडून या वेळी पाहायला मिळाला. खरे सांगायचे झाले तर इंग्लंडने या मालिकेत भारतीय संघाला आपल्या तालावर नाचवले. भारतात येऊन विजय कसा मिळवायचा, याचा उत्तम वस्तुपाठ इंग्लंडने दाखवला. इंग्लंडचा हा संघ क्रिकेट विश्वाच्या इतिहासात नक्कीच अजरामर होईल, पण देशवासीयांना ख्रिसमसचे ऐतिहासिक गिफ्ट दिल्याचा आनंद इंग्लंडच्या संघाला नक्कीच असेल.