वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर यजमान इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार पुनरागमन केलं. दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा सलामीवीर डोम सिबले आणि अष्टपैलू बेन स्टोक्सच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने ९ बाद ४६९ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. सिबलेने १२० तर स्टोक्सने १७६ धावांची खेळी केली. स्टोक्स आणि सिबले यांनी तिसऱ्या विकेटसाठी २६० धावांची भागीदारी केली. विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत स्टोक्सने १७६ धावांच्या खेळीत १७ चौकार आणि दोन षटकार लगावले. शतक झळकावल्यानंतर स्टोक्सने आपलं मधलं बोट दुमडून हात उंचावत सेलिब्रेशन केलं.

स्टोक्स प्रत्येकवेळी शतक झळकावल्यानंतर अशा पद्धतीने सेलिब्रेशन करतो. त्याच्या या सेलिब्रेशन स्टाईलमागे एक प्रेरणादायी कहाणी आहे. मधलं बोट दुमडून सेलिब्रेशन करण्याच्या स्टोक्सच्या स्टाईलमागे त्याचे वडिल जेड स्टोक्स यांचा संदर्भ आहे. मुळचे न्यूझीलंडचे असलेले जेड स्टोक्स हे रग्बी प्रशिक्षक म्हणून आपला मुलगा बेन स्टोक्ससोबत न्यूझीलंडवरुन इंग्लंडला आले. जेड स्टोक्स यांना रग्बी खेळत असताना आपल्या मधल्या बोटात काहीतरी प्रॉब्लेम असल्याचं जाणवलं. एक चांगला रग्बीपटू होण्यासाठी जेड स्टोक्स यांचं मधलं बोट आणि त्याला होणारी दुखापत नेहमी मारक ठरत होती.

अवश्य वाचा – Eng vs WI : अष्टपैलू स्टोक्सला दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान

अखेरीस डॉक्टरांनी जेड स्टोक्स यांना मधल्या बोटाची शस्त्रक्रीया करावी लागेल असा सल्ला दिला. ज्यासाठी त्यांना काही दिवस खेळापासून दूर रहावं लागणार होतं. पण रग्बीवर मनापासून प्रेम करणाऱ्या जेड स्टोक्स यांना ते शक्य नव्हतं. खेळत राहता यावं यासाठी जेड स्टोक्स यांनी डॉक्टरांना आपलं मधलं बोट कापण्याची परवानगी दिली. आपल्याला इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यासाठी वडिलांनी जे कष्ट उचलले त्याचा सन्मान आणि आदर राखण्यासाठी बेन स्टोक्स शतक झळकावल्यानंतर आपलं मधलं बोट दुमडून वडिलांचा सन्मान करतो. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यातही स्टोक्स अशा पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसला होता.