पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती  क्रीडानगरीत झालेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निमंत्रणपत्रिकेत नावे असूनही दांडी मारली. त्यामुळे अनेक क्रीडापटू, संघटकांनी नाराजी व्यक्त केली.
राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराकरिता मुख्य राज्यकर्त्यांनीच उदासीनता दाखवावी, याचेच आश्चर्य सर्वाना वाटले. या पाश्र्वभूमीवर एखाद्या जागतिक स्तरावरील नामवंत खेळाडूच्या हस्ते असे सूर ‘चर्चेच्या मैदानातून’ या व्यासपीठावर उमटत आहेत. याबाबत क्रीडामंत्री पद्माकर वळवी, अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते खो-खोपटू श्रीरंग इनामदार, ज्येष्ठ डेव्हिसपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नंदन बाळ यांनी आपले विचार व्यक्त केले.

पद्माकर वळवी
राज्याचे क्रीडामंत्री
शिवछत्रपती पुरस्कार हे राज्य शासनातर्फे दिले जात असतात. पुरस्कारार्थीची निवड ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक व संघटकांची निवड समितीच करते. पुरस्काराबद्दल जे प्रमाणपत्र दिले जाते त्यावर क्रीडामंत्री व क्रीडा राज्यमंत्री यांच्या स्वाक्षरी असतात. साहजिकच त्याचे वितरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे अशी केवळ शासनाची नव्हे तर अनेक खेळाडूंचीही इच्छा असते. आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोयीनुसारच कार्यक्रम ठरविला होता. मात्र कार्यबाहुल्यामुळे ते आले नाहीत. जर आम्ही सचिन तेंडुलकर यांना निमंत्रित केले असते तर कदाचित ऑलिम्पिकपदक विजेते अभिनव बिंद्रा किंवा सुशील कुमार का नकोत, असाही प्रश्न विचारला गेला असता. जगज्जेत्या खेळाडूमुळे या कार्यक्रमाची शोभा निश्चित वाढली असती, मात्र त्यामुळे आणखी नवीन वाद निर्माण झाले असते. असे वाद टाळण्यासाठीच आम्ही आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूंना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्याचे टाळले.

श्रीरंग इनामदार
अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते खो-खोपटू
हा पुरस्कार शासनातर्फे दिला जात असल्यामुळे त्याच्या वितरणाचा समारंभ मुख्य राज्यकर्त्यांच्या हस्ते होणे हे अधिकच उचित आहे. ज्याप्रमाणे अर्जुन, द्रोणाचार्य आदी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात, त्याप्रमाणे शिवछत्रपती पुरस्काराचे वितरण राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देणे उचित होईल. पुरस्काराचे वितरण हे शासनाचे कर्तव्यच आहे व ती कर्तव्ये त्यांनी पार पाडलीच पाहिजेत. मुख्य राज्यकर्त्यांनी त्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. आजपर्यंत राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या हस्तेच या पुरस्कारांचे वितरण झाले आहे. या वेळी यापैकी कोणीही नव्हते याचेच दु:ख अधिक वाटते. जागतिक कीर्तीच्या खेळाडूंकडून शासकीय
पुरस्कारांचे वितरण करणे
अयोग्य होईल. शिवछत्रपती क्रीडानगरीऐवजी राजभवनात हा कार्यक्रम होणे उचित ठरले असते.
राजभवनातील कार्यक्रमाला जी
शान असते तशी शान अन्यत्र
येणार नाही.

नंदन बाळ
ज्येष्ठ डेव्हिसपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक
कोणत्याही राज्याचे राज्यपाल हे त्या राज्याचे प्रथम नागरिक मानले जात असतात. त्यामुळेच राज्यपालांच्या हस्तेच या पुरस्कारांचे वितरण करणे अधिक योग्य आहे. या समारंभाकरिता दोन-तीन तासांचा वेळ देणे त्यांना सहज शक्य आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे हे खेळाडूंना आवडेलच. आजपर्यंत हे पुरस्कार राज्यपालांच्या हस्तेच दिले गेले आहेत. त्यामुळे राज्यपालांना केव्हा वेळ उपलब्ध आहे हे पाहून असे समारंभ ठरविले पाहिजेत. त्याचप्रमाणे पुरस्कारांबाबत नियमितपणा पाळणे आवश्यक आहे. खेळाडू वेळेबाबत वक्तशीर असतात. तसा वक्तशीरपणा राज्यकर्त्यांनी दाखविला पाहिजे. त्याचप्रमाणे हा समारंभ म्हणजे औपचारिकतेचा एक भाग न मानता अतिशय दिमाखदार सोहळ्यात करणे अधिक चांगले होईल. हा पुरस्कार स्वीकारणे हे प्रत्येक खेळाडू व संघटकासाठी एक स्वप्नच असते. त्यामुळेच हा कार्यक्रम संस्मरणीय करणे हे शासनाचे काम आहे.