भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील निवृत्तीच्या आठ वर्षानंतरही आपला जलवा कायम राखला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २१व्या शतकाचा महान कसोटी फलंदाज म्हणून निवडला गेला आहे. यात सचिनला श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकाराकडून मोठी स्पर्धा मिळाली. सचिन आणि संगकारा यांना समान गुण मिळाले, परंतु ज्युरीच्या सदस्यांनी सचिनच्या बाजूने जास्त मतदान केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने शनिवारी याची घोषणा केली. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधील २१व्या शतकाचा महान खेळाडू निवडण्यासाठी स्टार स्पोर्ट्सने एक पोल घेतला होता.

हेही वाचा – कसोटीत विराटची ‘दशक’पूर्ती.! वाचा त्याच्या कारकिर्दीतील खास १० गोष्टी

स्टार स्पोर्ट्समधून फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार या चार श्रेणींमधून प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली जाईल. फलंदाजांच्या गटात सचिन तेंडुलकर, स्टीव्हन स्मिथ, कुमार संगकारा आणि जॅक कॅलिस यांचा समावेश होता. गोलंदाजीत मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, डेल स्टेन आणि ग्लेन मॅकग्रा यांची नावे आहेत. जॅक कॅलिस, बेन स्टोक्स, अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि रवीचंद्रन अश्विन यांपैकी एकाची अष्टपैलू प्रकारात निवड होईल. कर्णधार श्रेणीमध्ये स्टीव्ह वॉ, ग्रिम स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि विराट कोहली यांना नामांकन देण्यात आले आहे. स्टार स्पोर्ट्सने यासाठी ५०-सदस्य ज्युरी नेमली आहे.

 

हेही वाचा – वय वर्ष ८३..! ‘वेटलिफ्टर दादी’चा व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

या ज्युरींमध्ये सुनील गावसकर, इयान बिशप, हरभजन सिंग, शेन वॉटसन, स्कॉट स्टायरिस, गौतम गंभीर यांच्यासह जगभरातील ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, विश्लेषक आणि अँकर यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनचा डंका

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये ५१ शतकांच्या मदतीने १५९२१ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकली आहेत. जॅक कॅलिस कसोटी क्रिकेटमध्ये ४५ शतकांसह १३२८९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ३८ शतके ठोकणार्‍या कुमार संगकाराने १३४ कसोटी सामन्यांमध्ये १२४०० धावा केल्या आहेत.