जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयसाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीचा रस्ता आता मोकळा झाला आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल अशी माहिती गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.

अवश्य वाचा – १९ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएलचा तेरावा हंगाम ! गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची माहिती

करोना विषाणूचा फटका जगभरातील सर्वच क्रीडा संस्थांना बसला. महामारीच्या काळात स्पर्धा भरवणं गरजेचं आहे का यावरुन गेल्या काही महिन्यांत अनेक चर्चाही झाल्या. परंतू यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे ४ हजार कोटींच्या घरात नुकसान होण्याची भीती होती. यासाठी सुरुवातीपासूनच बीसीसीआयने स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता स्थगित केली. आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआय आता तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी सज्ज झालं आहे.

जाणून घेऊयात बीसीसीआयचं आर्थिक गणित…

प्रेक्षपणाचे हक्क ३ हजार ३०० कोटी – Star India सोबत झालेल्या करारानुसार आयपीएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण करण्यासाठी बीसीसीआयला ३ हजार ३०० कोटींचा निधी मिळणं अपेक्षित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे Star India ने २ हजार कोटींची रक्कम बीसीसीायला याआधीच दिली आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला उरलेल्या तेराशे कोटींवर पाणी सोडावं लागलंच असतं…तसेच करारानुसार आधीच्या २ हजार कोटींपैकी काही रक्कमही Star India ला परत द्यावी लागली असती.

व्हिवो कंपनीकडून ४४० कोटींचा निधी – IPL स्पर्धेचं मुख्य प्रायोजकत्व स्विकारलेल्या VIVO कंपनीकडून बीसीसीआयला प्रत्येक हंगामाला ४४० कोटींचा निधी मिळतो. गेल्या काही दिवसांत गलवान खोऱ्यात भारत-चीन संघर्षामुळे बीसीसीआयवर व्हिवो कंपनीसोबतचा करार रद्द करावा असा दबाव होता. परंतू बीसीसीआयने पुढील वर्षासाठी या करारावर विचार करायचं आश्वासन देत यंदाच्या हंगामासाठी हा करार रद्द करणं शक्य नसल्याचं सांगितलं होतं.

इतर कंपन्यांकडून स्पॉन्सरशीपचे १७० कोटी – Dream 11, Paytm, CEAT यासारख्या अनेक कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार स्पॉन्सरशीपचे १७० कोटी रुपये मिळणं बीसीसीआयला अपेक्षित आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला या पैशांवरही पाणी सोडावं लागलं असतं.

आयपीएलमधून मिळणाऱ्या निधीतून काही भाग बीसीसीआय स्थानिक क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावर खर्च करतं. यंदाची स्पर्धा ही युएईमध्ये होणार असली तरीही या स्पर्धेचं आयोजन हे बीसीसीआयसाठी खर्चिक असणार आहे. Emirates Cricket Board ला यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. याचसोबत खेळाडूंचा राहणं, त्यांचा प्रवास व इतर खर्च या सर्व गोष्टींचा भार बीसीसीआय आणि संघमालकांना घ्यावा लागणार आहे.