दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेला फुटबॉल विश्वचषक शकिराच्या ‘वाका वाका’ गाण्याने गाजला होता. जगभरातील आबालवृद्धांनी या धमाल सुरावटीवर ताल धरला होता. चार वर्षांनंतर जबरदस्त ऊर्जेचे प्रतीक सांबा नृत्याची भूमी असणाऱ्या ब्राझीलमध्ये विश्वचषक होतो आहे. विश्वचषकाचे अधिकृत गीत म्हणून ‘ओ ला ला’ (वुई आर वन) असणार आहे. काही महिन्यांपूर्वीच शकिरासह काही गायकांच्या आवाजातील हे गीत चाहत्यांसाठी खुले झाले. या हरहुन्नरी गीताला अमेरिकेतील पिटबुलने म्युझिक व्हिडीओची जोड दिली आहे. लॅटिन ग्रॅमी पुरस्कारप्राप्त फ्लोरिडासह प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ आणि ब्राझीलची स्थानिक गायिका क्लॉडिआ लेइटी यांनी या व्हिडीओला स्वरसाज दिला आहे. ब्राझीलमधील तरुणतरुणी झेंडय़ासह या गाण्यावर थिरकत आहेत, असे या व्हिडीओचे स्वरुप आहे. दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषक यशस्वी करण्यात वाका वाकाची भूमिका निर्णायक ठरली होती. ‘ओ ला ला’ गाण्याला तसेच व्हिडीओला चाहत्यांची अशीच पसंती मिळावी अशी संयोजकांना आशा आहे.