निरोपाची कसोटी खेळण्याची संधी न मिळाल्याचे दु:ख कायम राहील, अशा शब्दांत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मनातली खंत व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.

सेहवागने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबाद येथे शेवटची कसोटी खेळली होती. ‘‘संघातून वगळणार असल्याचे निवड समितीने मला सांगितले असते, तर दिल्ली कसोटीत मला खेळू देण्याची विनंती त्यांना केली असती. या कसोटीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती. मात्र निवड समितीने मला ही संधीच दिली नाही,’’ अशा शब्दांत सेहवागने मनातले दु:ख व्यक्त केले. दूरचित्रवाणीवरील खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिनधास्त सेहवागने आपले मन मोकळे केले.

तो पुढे म्हणाला, ‘‘खेळताना निवृत्त होण्याची संधी नाकारण्यात आली याचे दु:ख नेहमीच मनात राहील. मात्र अशा गोष्टी क्रीडापटूंच्या आयुष्याचा भाग असतात. खेळताना निवृत्तीची भावना मनात डोकावली नव्हती, मात्र संघातून वगळल्यानंतर त्याची जाणीव झाली.’’ एक तपापेक्षा जास्त कालावधीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला निरोपाची कसोटी संधी मिळू नये का, असा सवालही सेहवागने केला.

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेदरम्यान दिल्लीतील कसोटीदरम्यान सेहवागचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्याविषयी विचारले असता सेहवाग म्हणाला, ‘‘ही चांगलीच गोष्ट आहे. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करू शकले नाही, तर किमान दिल्ली क्रिकेट संघटनेने जबाबदारी घ्यावी. हा केवळ माझ्यापुरता मर्यादित विषय नाही. निवृत्त होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान व्हायला हवा.’’

कोणताही खेळाडू सलग चार ते पाच सामन्यांत अपयशी ठरल्यास त्याला वगळण्यात यावे. त्या वेळी तो वरिष्ठ आहे का कनिष्ठ, हा निकष लावण्यात येऊ नये, असे परखड मतही सेहवागने व्यक्त केले.

सचिन तेंडुलकर आणि मायकेल क्लार्क यांच्या संदर्भातला किस्साही सेहवागने सांगितला. २३ वर्षीय क्लार्कला ऑस्ट्रेलियाच्या संघात समाविष्ट करण्यात आले होते. त्या वेळी तो सचिनला तुझे वय झाले आहे. तू क्षेत्ररक्षण करू शकत नाहीस, असे बोलत होता. त्या वेळी मी क्लार्कजवळ गेलो आणि त्याला सांगितले, तुझे जेवढे वय आहे तेवढी शतके सचिनने झळकावली आहेत.

पाकिस्तानविरुद्ध अफलातून कामगिरीचे रहस्य काय याविषयी विचारले असता सेहवाग म्हणाला, ‘‘भारत-पाकिस्तान सामन्यांना प्रचंड गर्दी होते. टेलिव्हिजनवरही असंख्य चाहते सामना पाहतात. खेळाडूंकडून मोठय़ा अपेक्षा असतात. दोन संघांमधले द्वंद्व अनोखे असते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध धावा करताना समाधान मिळते.’’